महाविकास आघाडीची भ्रष्टाचार करण्यात पीएचडी:महाराष्ट्राचा विकास त्यांच्या हाताबाहेरची गोष्ट, चिमुरच्या सभेत पीएम मोदी कडाडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. या सभेला उपस्थित असणाऱ्या मतदारांच्या संख्येवरून या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. राज्यात महायुतीचे बहुमताचे सरकार येणार हे स्पष्ट आहे. केंद्र व राज्यात डबल इंजिनचे सरकार असल्यामुळे विकासाचा वेगही दुपटीने वाढेल, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी चंद्रपूरच्या चिमुर विधानसभा मतदारसंघात सभा झाली. या सभेत त्यांनी महायुतीच्या संकल्पपत्राचे कौतुक करत हे संकल्पपत्र महाराष्ट्राच्या पुढील 5 वर्षांच्या विकासाची गॅरंटी असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, महायुतीच्या संकल्पपत्रात लाडकी बहीण, शेतकरी, तरुण व महाराष्ट्राच्या विकासासाठी एकाहून एक सरस संकल्प करण्यात आलेत. एआय यूनिव्हर्सिटी असेल किंवा वॉटर ग्रिड प्रकल्प असतो, प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा असेल, पक्के घर असो, डिजिटल कनेक्टिव्हिटी जाळे पसरवणे असो या सर्वांचा यात समावेश आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला या संकल्पपत्रासाठी शुभेच्छा देतो. हे संकल्पपत्र पुढील 5 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी बनेल. महायुतीसोबत केंद्रात एनडीएचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार येईल. म्हणजे विकासाचा वेगही दुप्पट वेगाने होईल. महाराष्ट्राच्या लोकांनी मागील अडीच वर्षांत विकासाचा हा दुप्पट वेग पाहिला आहे. आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. येथे विकासाच्या अनेक योजना होत आहेत. आज राज्यात जवळपास 1 डझन वंदे भारत रेल्वे धावत आहेत. राज्यातील 100 हून रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. एवढेच नाही तर अनेक रेल्वेमार्गांचा विस्तारही होत आहे. महायुतीचे सरकार किती वेगाने काम करते हे जनता पाहत आहे. पण ही महाविकास आघाडीची जमात या वेगाला कशी खिळ घालते हे चंद्रपूरच्या जनतेला चांगलेच ठावूक आहे. येथील जनता अनेक दशकांपासून रेल्वेची मागणी करत होते. पण काँग्रेस आघाडीने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आमच्या सरकारने कांपा – वरोरा रेल्वे लाईनला मंजुरी दिली, नागपूर – गडचिरोली रेल्वे लाईनचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे. याचा जनतेलाच फायदा होईल. त्यांचा वेळ व पैसे वाचतील, असे मोदी म्हणाले. महाराष्ट्राचा वेगवान विकास ही महाविकास आघाडीच्या हाताबाहेरची गोष्ट आहे. आघाडीने केवळ विकासाला ब्रेक लावण्याची पीएचडी केली आहे. कामांना अडवून ठेवण्यात काँग्रेसने डबल पीएचडी केली आहे. त्यांनी आपल्या अडीच वर्षांच्या काळात मेट्रोपासून वाढवण बंदर ते समृद्धी महामार्गाला रोखण्याचे काम केले. त्यामुळे आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू हे लक्षात घ्यावे. त्यामुळे पुन्हा त्यांना लुटीचा परवाना मिळवू देऊ नका, असे मोदी म्हणाले. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…

  

Share