कोल्हापूरच्या नांदणी येथील महादेवी (माधुरी) हत्तीणीला परत आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न सुरू केले आहेत. आज पहाटेपासूनच स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आत्मक्लेष पदयात्रा काढण्यात आली होती. नांदणीपासून ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या यात्रेत सर्वसामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी हजारो लोक रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच हे एक षड्यंत्र असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी यावेळी केला आहे. नांदणी जैन मठ तसेच हत्तीवर प्रेम करणारे विविध माध्यमातून चळवळ उभी करत आहेत. माधुरी हत्तीणीला परत मठात आणण्यासाठी राजकीय स्थानिक नेत्यांसह सर्व सामान्य जनतेने ही चळवळ सुरू केली आहे. ‘एक दिवस महादेवी’साठी पहाटेपासून नांदणी मठापासून पदयात्रा काढण्यात आली होती. या मूक पदयात्रेत सर्व कोल्हापूरकर सहाभगी झाल्याचे दिसून आले. सायंकाळी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही पदयात्रा दाखल झाली. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी वनतारावर व सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राजू शेट्टी म्हणाले, पेटा संघटनेच्या तक्रारीवरून महादेवी हत्तीला गुजरातच्या वनताराला पाठवण्यात आले आहे. हा सर्व षड्यंत्राचा भाग होता, असा गंभीर आरोप केला. त्यासाठी आत्मक्लेश पदयात्रा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देणार असल्याचे शेट्टी म्हणाले. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले, जैन समाजाची परंपरा व प्रतिष्ठा खंड पाडण्याचा डाव या मंडळीनी रचला गेला. संस्कृती, इतिहास, परंपरा, वारसा या सगळ्या गोष्टी समाज म्हणून गेल्या 1200 वर्षापासून नांदणी मठाकडून जपल्या जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे शासनाचे हत्ती संगोपन केंद्र आहे. शिवाय कर्नाटक, केरळ येथेही हत्ती पुनर्वसन केंद्र असताना तो नेमका ‘वनतारा’कडे सुपूर्द करण्यास सांगितले जाण्याचे कारण काय? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. निरोप देत असताना महादेवीच्या डोळ्यांत अश्रू होते महादेवी हत्तीणी जात असताना आपल्याला आणि मंदिराला विसरली नाही. निरोप देत असताना तिच्या डोळ्यांत अश्रू होते. तिने जाताना मंदिराला अभिवादन केले, मगच तिने गावाचा निरोप घेतला होता. खरंतर आपल्या माधुरीवर अन्याय झाला आहे. तुम्हाला ‘अंधा कानून’ हा चित्रपट माहिती आहे. या चित्रपटात खोटे पुरावे तयार करुन कोर्ट नायकाला जन्मठेपेची शिक्षा देत. तशीच परिस्थिती आपल्या माधुरीच्या बाबतीत झाली असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. महाराष्ट्र आणि देशात मुकेश आणि अनंत अंबानी यांचे गुलाम झाले आहेत, असे वाटत आहे. मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांनी प्राणी संग्रहालय तयार केले आहे. त्या प्राणी संग्रहालयाचे नाव वनतारा आहे. या देशात प्राणी संग्रहालय कुणी सुरु करावे, त्याला मान्यता कुणी द्यावी याला काही कायदे आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय प्राणी प्राधिकरण काम करते. ते प्राधिकरण प्राणी संग्रहालयाला प्राधान्य देण्याचे काम करते. वनतारा ही संस्थाच बोगस संभाजीनगरच्या एका वकिलाने माहितीच्या अधिकारी माध्यमातून वनताराची माहिती मिळाली. त्यांनी सांगितले की, वनतारा नावाची प्राणी संग्राहालय अस्तित्वात नाही. माझ्याकडे ते पत्र आहे. याचा अर्थ वनतारा ही संस्थाच बोगस आहे. या संस्थेमध्ये मुक्या जंगली प्राण्यांची तस्करी सुद्धा होते, अशी माझी माहिती आहे. वनतारामध्ये आतापर्यंत सव्वा दोनशे पेक्षा जास्त हत्ती आहेत. तरीही त्यांना आमची माधुरी आवडली. का? कारण ती अतिशय देखणी आहे. सुशिक्षित आहे आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासारखी आहे. म्हणून तिच्याबद्दल खोटा रिपोर्ट संस्थेला करायला लावला. तिची देखभाल होत नाही, तिच्या पायाला जखमा आहेत, असे खोटे आरोप करण्यात आल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. अंबानीला भीक मागायला लावा जो नांदणी मठ 1200 वर्षांपूर्वी अस्तित्वात आला, ज्या नांदणी मठात 700 पेक्षा जास्त वर्षांपासून हत्ती सांभाळण्याची आणि वाढवण्याची परंपरा आहे. तो मठ भीक मागण्यासाठी हत्ती वापरतो, असा आरोप करण्यात आला आहे. आपल्या माधुरीचा 1 लाख रुपये खर्च आहे. अंबानीला भीक मागायला लावा. हत्ती बाळगणे हे अतिशय खर्चिक आहे. ही मठाची परंपरा आहे. म्हणून आपण सर्वजण तो खर्च करतो. माधुरी 35 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतात खेळली बागडली पण कुणाचे नुकसान केले नाही. हत्तीला राहण्याकरात अतिशय चांगले वातावरण आपल्याकडे आहे, असे देखील राजू शेट्टी यावेळी म्हणाले.