छत्रपती संभाजीनगर येथील ‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील’ विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी देखील वसतिगृहातील सोयी-सुविधा, खाणावळीतील जेवणासह प्रशासनाकडून विविध निर्बंध लादले जात असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या मांडला. विविध मागण्यांचे हाती फलक घेत, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी सकाळी नऊ वाजेपासून आंदोलनास सुरुवात केली. तासिका, भोजनास न जाता विद्यार्थ्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या दिला. प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांसह विविध सत्रातील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध तक्रारी मांडल्या. खाणावळीतील अन्नाच्या गुणवत्तेबद्दल विद्यार्थ्यांनी असमाधान व्यक्त करत, खानावळीत निकृष्ट जेवण मिळते, साफ सफाईचा अभाव असतो. प्लेट्स, भांडी आणि जेवणाच्या जागेची स्वच्छता खराब असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. कॅन्टीन मधील वस्तूंच्या किंमती आणि गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली. गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीस ठेवण्यात याव्यात अशी, मागणी केली. यासह रात्री पालकांना वसतिगृह वॉर्डन, प्रशासनाकडून कॉल केला जातो. विद्यार्थ्यांच्या रूममध्ये प्रवेश करून रूमची तपासणी केली जाते, प्रायव्हसी पाळली जात नाही, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला. आंदोलनानंतर प्रशासनाने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शासनाने २०१७ साली कांचनवाडी येथील पन्नास एकर जागेत महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू केले. सध्या या विद्यापीठात बीए एलएल बी आणि एलएलएम अभ्यासक्रमासह विविध प्रकारचे अकरा अभ्यासक्रम सुरू आहेत. विविध अभ्यासक्रमाचे सुमारे आठशे विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. फी जास्त, नीट बोलत नाही, टोमणे मारत असल्याची तक्रार आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यांनी सकाळचा नाश्ता केला नाही. दुपारचे जेवण न करता, विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीसमोर आणि हिरवळीवर बसून आंदोलन करत होते. प्रथम वर्षाला गणवेश फक्त एकच दिवस हवा, 9 ते 5 क्लास असतो, त्या वेळेत बदल हवा, वैद्यकीय सुविधा दिल्या जात नाहीत. फी जास्त, नीट बोलत नाही, टोमणे मारत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. सुधारणा करण्याचा प्रयत्न विद्यापीठाने वसतिगृहाबाबत नियमावली, निकष निश्चित केलेले आहेत. त्याचे पालन प्रत्येक विद्यार्थ्यांने करणे अपेक्षित आहे. विद्यार्थी कायद्याचे अभ्यासक आहेत. विद्यापीठ प्रशासनाकडून विविध सुधारणा सातत्याने करण्यात येतात. आणि आणखीही सुधारणा करण्याचा प्रयत्न आमचा असतो. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्यांवर ही प्रशासकीय स्तरावर आम्ही विचार करतो आहोत. जे योग्य असेल ते प्रशासकीय पातळीवरून केले जाईल. – डॉ. बिंदू रोनाल्ड, कुलगुरू, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.