महाराष्ट्रात उष्माघाताचा दुसरा बळी:राज्यात उष्णतेचा कहर वाढला, आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर

महाराष्ट्रात तापमान चांगलेच वाढत असताना दिसत आहे. याचा परिणाम म्हणजे राज्यात उष्माघाताचा दूसरा बळी गेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठ येथे शिक्षण घेणारा इयत्ता सहावीतील संस्कार सोनटक्के (12) याचा कडक उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. उन्हाचा त्रास होऊ लागल्याने त्याला पालकांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार घेत असतानाच संस्कारचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सोनटक्के कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जिल्ह्यात संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती अकोला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळविण्यात आली आहे. त्यामुळे, आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून नागरिकाना काही महत्त्वाच्या सूचना खबरदारीचा उपाय म्हणून केल्या जात आहेत. उन्हाच्या झळा माणसाच्या जीवावर उठल्या:महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी राज्यात गेल्या महिन्यात उष्माघाताचा पहिला बळी हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव येथे गेला होता. येथील 25 वर्षीय अमोल दामोदर बावस्कर नामक तरुणाचा उन्हामुळे मृत्यू झाला आहे. सोयगाव तालुक्यातील निमखेड बसस्थानकावर ही घटना 26 मार्च रोजी घडली होती. हा तरुण उन्हात बस थांब्यात विसावा घेत होता. तेव्हा तो अचानक कोसळला. या प्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने जनतेला उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, राज्यात बहुतांश भागात तापमान 40 अंशांच्या पलीकडे गेले आहे. यामुळे नागरिकांना उन्हाचा चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. उष्माघाताचे बळी जाण्याची दुसरी घटना घडल्यानंतर आरोग्य प्रशासनाने तातडीने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यक असेल तरच दुपारच्या वेळी घराबाहेर पडा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे बुलढाणा येथे जिल्हा प्रशासनाने शाळा देखील सकाळच्या सत्रात भरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयात उष्माघाती कक्षाची निर्मिती केली जात आहे.

  

Share