महाराष्ट्राच्या कंपनीचा गुजरातच्या व्यावसायिकास 65 कोटींचा गंडा:हळद शेतीच्या नावाखाली फसवणूक, राजकोट पोलिसांकडून 4 अटकेत

महाराष्ट्रातील एएस अ‍ॅग्री अँड अ‍ॅक्वा कंपनीने राजकोटमधील एका व्यावसायिकाला हळदीच्या शेतीत उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून ६४ कोटी ८० लाख रुपयांचा गंडा घातला. याबाबत राजकोटचे व्यावसायिक प्रशांत प्रदीप कनाबर यांनी तक्रार दिली. त्यानंतर महाराष्ट्रातील १९ आरोपींविरुद्ध राजकोट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करून आरोपींना पकडण्यासाठी महाराष्ट्रात पाठवण्यात आली. या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रवीण वामन पठारे (३९), हर्षल महादेवराव ओझे (४९), वैभव विलासराव कोटलापुरे (४९) आणि हिरेन दिलीपभाई पटेल (३७) यांना अटक केली. हे चारही आरोपी एएस अ‍ॅग्री अँड अ‍ॅक्वा कंपनीत अडीच टक्के हिस्सा असलेले भागीदार व कर्मचारी आहेत. या गुन्ह्यातील तीन आरोपी संदेश खामकर, प्रशांत जडे आणि संदीप सामंत हे आधीच्या प्रकरणात महाराष्ट्रात तुरुंगात आहेत. त्यांना लवकरच तुरुंगातून ताब्यात घेऊन कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. तक्रारदाराची काही महिन्यांपूर्वी चंद्रकांतभाई पटेल यांच्याशी भेट झाली. त्यांनी हळद शेती प्रकल्पाची माहिती दिली, ज्यामध्ये मुंबईस्थित एएस अ‍ॅग्री अ‍ॅक्वा कंपनीचा समावेश होता. चांगल्या उत्पन्नासाठी त्यांनी आर्थिक व्यवहार सुरू झाला. मोठी गुंतवणूक करूनही पैसे परत मिळेनात. तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Share