महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई रिक्षा वाटप:नागपूरमधून योजनेला सुरुवात, मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना नवे गिफ्ट

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत महाराष्ट्रातील 10 हजार गरजू महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप केले जाणार आहे. नागपूर येथून दिनांक 20 एप्रिल रोजी गरजू महिलांना सवलतीच्या दरात पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 8 जिल्ह्यांमध्ये 10 हजार पिंक ई रिक्षा वाटप केले जात आहेत. यात नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. पिंक रिक्षाच्या एकूण किमती पैकी 20 टक्के अनुदान राज्य सरकार देणार असून 10 टक्के रक्कम लाभार्थी महिलांना द्यावे लागणार आहे. तर उर्वरित 70 टक्के रक्कम सवलतीच्या व्याजदरावर कर्ज म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. योजनेच्या शुभारंभावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंक इ-रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्याचा वितरण नागपुरात करतो आहे, याचा आनंद आहे. नागपुरात 2000 महिलांना पिंक रिक्षा दिल्या जातील. राज्यातील दहा हजार महिलांना रोजगार देण्याचा उद्दिष्ट तर या योजनेमागे आहेच. सोबतच शहरात महिलांना सुरक्षित सार्वजनिक वाहतूक तिचे साधन मिळावे, रात्री अपरात्री महिला या पिंक इ-रिक्षाच्या माध्यमातून सुरक्षित फिरू शकतील, असे उद्दिष्टही या योजनेमागे असल्याचे फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजनेसारखीच ही पिंक इ रिक्षा योजना आहे. या माध्यमातून महिलांना पायावर उभा राहता आले पाहिजे असा उद्देश आहे. तसेच कामकाजी महिलांना प्रवासात सेफ, सुरक्षित वातावरण मिळावे, म्हणून महिलाद्वारे चालवल्या जाणाऱ्या इ-रिक्षा उपलब्ध करून देण्याचा उद्दिष्ट आहे. महिलानी महिलांसाठी अशी ही रिक्षा असणार आहे. मात्र यात पुरुषांनी बसू नये, असा त्याचा अर्थ नाही. जसे महिला त्यांच घर संसार चांगले चालवतात, तशीच इ-रिक्षा ही चांगली चालवा, सर्वांना सुरक्षित ठेवा. सर्व लाभार्थी महिलांना शुभेच्छा, असे फडणवीस म्हणाले.

  

Share