उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे मंगळवारी दुपारी तीन तासांत तीन ठिकाणी ढगफुटीमुळे भीषण नुकसान झाले. गंगोत्री महामार्गावरील धराली, हर्षिल आणि सुखी गावात या घटना घडल्या. गंगोत्रीच्या १८ किमी आधी असलेल्या धारली गावात ढगफुटी झाल्यामुळे दुपारी १२:४० वाजता पहिली घटना घडली. यामुळे श्रीखंड डोंगरातून उगम पावणाऱ्या खीरगंगा नदीत दुपारी १:२७ वाजता आलेल्या लोंढ्याने पूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेला. गंगोत्रीकडे जाणाऱ्या मार्गावरील धराली हे मुख्य थांबा आहे. मुख्य सचिव आनंद वर्धन यांच्या मते धरालीची लोकसंख्या सुमारे ७०० आहे. यातील १०० जण बेपत्ता आहेत. १५० हून अधिक घरांच्या गावात ५० घरे, ३९ हून जात रिसॉर्ट, हॉटेल, २५ होम स्टे उदध्वस्त झाले आहेत. उत्तरकाशीचे डीएम प्रशांत आर्य यांनी ४ मृत्यूंची पुष्टी केली. १०० वर लोक बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दुसरी घटना दुपारी २ वा.धरालीपासून ५ किमीवरील हर्षिल येथे घडली. तेलगाड नाल्यातील पुरामुळे लष्करी छावणीत पाणी शिरले. लष्कराचे हेलिपॅडही उद्ध्वस्त होऊन ११ सैनिक बेपत्ता झाले. तिसरी घटना दुपारी ३ च्या सुमारास धरालीपासून ७ किमी पुढे सुखी गावाजवळ घडली. ५ राष्ट्रीय महामार्ग, ७ राज्य महामार्ग, २ सीमावर्ती असे १६३ रस्ते बंद आहेत. गंगोत्री धाम व केदारनाथ धामची यात्रा २४ तासांसाठी थांबवली. श्रीखंड पर्वतावरून मलबा भागीरथी नदीत पोहोचल्याने तलाव निर्माण झाला असून रेड अलर्ट दिला. हिमालयाच्या भेगांवरील धराली गाव १० वर्षांत तिसऱ्यांदा उद्ध्वस्त डेहराडून | धराली गावात १८६४, २०१३ आणि २०१४ मध्येही डोंगरावर ढगफुटी झाली होती. त्यामुळे खीर नाल्याने मोठे नुकसान घडवले. भूगर्भशास्त्रज्ञांनी या तिन्ही संकटांनंतर धराली गाव अन्यत्र हलवावे अशी शिफारस राज्य सरकारला केली होती. त्यांनी सांगितले होते की, आपत्तीच्या दृष्टिकोनातून धराली गाव जणू वेळेच्या स्फोटकावर बसले आहे. वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. एस. पी. सती सांगतात की, धराली गाव ट्रान्स हिमालय क्षेत्रात (४ हजार मीटरपेक्षा उंच) “मेन सेंट्रल थ्रस्ट” या भूगर्भीय दुभंगावर आहे. हा दुभंग मुख्य हिमालयाला ट्रान्स हिमालयाशी जोडतो. हे क्षेत्र भूकंपासाठी अतिसंवेदनशील मानले जाते. ज्या डोंगरातून खीरगंगा नदी येते, तो सुमारे ६ हजार मीटर उंच आहे. जेव्हा इथून पूर येतो, तेव्हा धरालीचा विध्वंस होतो. सुमारे ६ महिन्यांपूर्वी डोंगराचा एक भाग तुटून खीर नदीत पडत होता, तो अडकला होता. यावेळी तोच भाग कोसळल्याची शक्यता आहे. १० मी. रुंद नदी क्षणार्धात ३० मी. झाली… या संकटाचे पहिले प्रत्यक्षदर्शी अशोक सेमवाल यांनी ‘भास्कर’ला सांगितले, “मी माझ्या मुखबा गावात डोंगरावर घराबाहेर उभा होतो. तेव्हा दुपारचे सुमारे बारा वाजून चाळीस मिनिटे झाली होती. तेव्हाच अचानक स्फोटासारखा आवाज झाला. संपूर्ण कुटुंब घाबरून बाहेर आले. तेव्हा डोंगराच्या वर धूर उठताना दिसला. ढगफुटी झाली होती. काही वेळातच एका डोंगरी नाल्यात (गधेरा) प्रचंड पाण्याचा प्रवाह वाहताना दिसला. मी लगेच त्याची चित्रफीत काढू लागलो. दोन-तीन सेकंदांतच खरीगाडमध्ये डोंगर महापुरासारखा कोसळताना दिसला. आम्ही ओरडू लागलो, कारण धरालीत पर्यटक होते. लोक काही समजून घेईपर्यंत फक्त तीस सेकंदांत पूर तिकडे पोहोचला. १० मीटर रुंद खीर नदी ३० मीटर रुंद झाली. लोकांना पळायलाही वेळ मिळाला नाही. गाड्या, घरे, इमारती, मनोरे… सगळं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलं. संपूर्ण गाव सपाट झालं. तिथं माझा मित्र खुशी राहत होता. अनेक ओळखीचे लोक होते, पण कुणाचाच काही थांगपत्ता नाही. चहूकडे पंधरा ते वीस फूट माती व दगडांचे ढिगारे आहेत. हर्षिल, मुखबा व धराली ही उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत. धराली हे लहान गाव असून सुमारे ६०० लोकसंख्या आहे. हिमालयाच्या मध्यभागी वसलेले धराली हे एक अतिशय सुंदर गाव आहे. पूर आला होता तेव्हा येथील लोकांना त्याची कल्पनाही आली नाही. जेव्हा पूर अगदी जवळ आला तेव्हा प्रवाहाचा आवाज येऊ लागला. लोक रस्त्यावर धावू लागले, पण काही सेकंदांतच पुराने इमारतींना वेढले आणि त्या उद्ध्वस्त झाल्या. आवाज थांबल्यानंतर धराली गाव ढिगाऱ्यात गाडले गेले होते. संकटात धराली येथील प्राचीन कल्पकेदार महादेव मंदिरही मलब्याखाली गाडले गेले. भागीरथी नदीकिनारी असलेले हे १५०० वर्षे जुने मंदिर पंचकेदार परंपरेशी संबंधित होते आणि स्थानिक लोकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र होते. नांदेडचे ११ भाविक सुखरूप नांदेड | उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे मंगळवारी परिस्थिती गंभीर झाली आहे. मात्र, केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी १ ऑगस्टला नांदेड जिल्ह्यातील डोणगाव (ता.बिलोली) येथून गेलेले ११ भाविक सुखरुप आहेत. प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क केला आहे. नांदेडचे सर्व भाविक घटनास्थळापासून १५० किमी दूर आहेत.


By
mahahunt
6 August 2025