महाविकास आघाडीचे मनसुबे उधळणार:देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार; म्हणाले – मविआचे धर्माचा वापर करून जिंकण्याचे स्वप्न

धर्माचा वापर करून महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष व्होट जिहाद करीत आहेत हे अतिशय खेदजनक आहे. पण धर्माचा वापर करून निवडणुका जिंकण्याचे महाविकास आघाडीचे मनसुबे उधळून लावू असा सज्जड दम नागपुरात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला. ते येथे माध्यमांशी बोलत होते. ऑल इंडिया उलेमा कौन्सिलने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. कौन्सिलचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी १७ मागण्यांचे एक निवेदनही दिले आहे. या देेशाच्या इतिहासात निवडणुकीत इतके लांगुलचालन यापूर्वी कधी पाहिले नव्हते. अल्पसंख्यक मते मिळवण्याकरीता अशा प्रकारे महाविकास आघाडी काम करीत असेल तर त्या विरोधात सगळ्यांना एक व्हावेच लागेल. आणि मुठभर मतांवर आपण निवडून येवू शकतो असे महाविकास आघाडीला वाटत असेल तर बहुसंख्य मतदारांना पुनर्विचार करावा लागेल असा इशारा फडणवीस यांनी दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये २०१२ पासून झालेल्या दंगलीमध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांवर गुन्हे दाखल केले. महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर २०१२ ते २०२४ पर्यंत मुस्लिम समाजाच्या लोकांवर दाखल केलेले गुन्हा परत घ्यावे, मुस्लिमांना १० टक्के आरक्षण द्यावे अशा या मागण्या आहेत. व्होट जिहादचे सिपाह सालार राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले असल्याचे नोमानी यांनी व्होट जिहादचे आवाहन करणाऱ्या व्हिडीओत सांगितले आहे. नोमानी यांचा दुसराही व्हिडीओ आलेला आहे. काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी लोकसभेत भाजपाला मतदान केले. त्यांना शोधून काढा, त्यांचे दाणापाणी बंद करून त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन नोमानी यांनी केले आहे. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. महाविकास अाघाडीचे आत्यंतिक ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न आम्ही हाणून पाडू. सामाजिक बहिष्कार करणे हा गुन्हा आहे. अशा प्रकारे कोणावरही सामाजिक बहिष्कार घालता येत नाही. म्हणूनच किरीट सोमय्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे एक तक्रार केली आहे. काँग्रेस लोकांना जातीजातीत वाटतण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करून निवडणूक जिंकायची आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेला “एक है तो सेफ है’चा नारा किती योग्य आहे हे यावरून दिसून येते. काँग्रेस जवळ निवडणुकीत सांगण्यासारखे मुद्दे नाही. त्यांच्याकडे विकासाचा रोडमॅप नाही. ते विकासावर बोलत नाही. त्यामुळे फक्त जातीयवाद करून निवडणुका जिंकण्यावर त्यांचा भर असल्याची टिका फडणवीस यांनी केली.

  

Share