माझे सिंदूर आमच्याच गावात पुसले गेले:माझ्या सिंदूरचे काही मोल नाही का? पंकज देशमुखांची हत्याच पत्नीचा दावा; मुख्यमंत्र्यांकडे न्यायची मागणी

पहलगाम हल्ल्यात देशातील भगिनींचे कुंकू पुसले गेले. या हल्ल्यात अनेक महिलांना दहशतवाद्यांनी विधवा केले. याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आणि या हल्ल्यात शेकडो दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला. देशाच्या सीमेवर अशी परिस्थिती असली तरी देशांतर्गत महिलांचेच सिंदूर सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. बुलढाणा येथील भाजपचे आमदार संजय कुटे यांचे वाहनचालक पंकज देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून भावनिक पोस्ट लिहिली आहे. सुनीता पंकज देशमुख यांची भावनिक पोस्ट सुनीता देशमुख यांनी लिहिले की, “माझे सिंदूर आमच्याच गावात पुसले गेले. मला न्याय हवा. पहलगामचे सिंदूर दिसले आणि जे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद गावात पुसले गेले त्याचे काय? माझे सिंदूर सिंदूर नाही का? माझ्या सिंदूरचे काही मोल नाही का? माझे मिस्टर गेली वीस वर्षांपासून भाजप कार्यकर्ते आहेत. भाजप कार्यकर्त्याला न्याय मिळेल का? 3 मे 2020 रोजी माझ्या पतीचे निधन झाले. माझी मुलगी फक्त अकरा वर्षांची आहे आणि माझा मुलगा आठ वर्षांचा आहे. त्यांना न्याय मिळेल का? पहलगाम तर दूरचा विषय आहे, गावातही जनता सुरक्षित नाही”. बुलढाणा येथील जळगाव जामोदचे भाजपचे कार्यकर्ते व भाजप आमदार संजय कुटे यांचे वाहनचालक पंकज देशमुख यांचा मृतदेह 3 मे रोजी शेतात आढळून आला होता. त्यानानंतर ही आत्महत्या असल्याचे बोलले गेले. परंतु ही आत्महत्या नसून ही हत्या असल्याचा दावा त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी केला आहे. काय आहे प्रकरण? आमदार संजय कुटे यांचे वाहनचालक पंकज देशमुख यांचा मृतदेह 3 मे रोजी जळगाव जामोद येथील बऱ्हाणपूर रोडवरील एका शेतात आढळून आला होता. त्यांचा मृतदेह रुमालाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता तसेच त्यांचे हातांवर व पायांवर जखमाही आढळल्या होत्या. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर हा मृत्यू संशयस्पद असल्याची चर्चा सुरू झाली. पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी अमरावतीचे पोलिस महानिरीक्षक व बुलढाणाच्या पोलिस आधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. ही आत्महत्या नसून हा घातपात असल्याची तक्रार सुनीता देशमुख यांनी केली. माझ्या पतीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी देखील सुनीता देशमुख यांनी केली. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. दरम्यान, बीडचे संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच अशा प्रकारची घटना बुलढाणा येथे घडून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बीडची बुलढाण्यात पुनरावृत्ती झाली आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

  

Share