परभणीच्या पालकमंत्री एका शासकीय कार्यक्रमात ग्रामसेवकावर संतापल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला कानाखाली अशी भाषा वापरल्याचे व्हिडिओत दिसून आले. या व्हिडिओवरून मेघना बोर्डीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा तो राग माझ्या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता, असे स्पष्टीकर मेघना बोर्डीकर यांनी दिले असून, आमदार रोहित पवार यांना टोलाही लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मेघना बोर्डीकरांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तसेच या मंत्र्यांना आवरा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली होती. या व्हिडीओवरुन सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता मेघना बोर्डीकर यांनी या व्हिडीओबद्दल स्पष्टीकरण देत, रोहित पवारांवरही निशाणा साधला आहे. मेघना बोर्डीकर यांचे नेमके स्पष्टीकरण काय? मेघना बोर्डीकर यांनी रोहित पवारांच्या ट्वीटला उत्तर देत संबंधित व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिले. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भगीनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाची तक्रारी करत असतील तर हा त्रागा, राग माझ्या लाडक्या बहिणीच्या हक्कासाठी व्यक्त झाला आहे, असे मेघना बोर्डीकर यांनी म्हटले आहे. जिल्ह्याची पालक या नात्याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां समोर ग्रामसेवकाला दिलेली ही समज आहे. सामान्य जनतेला त्रास देवू नका, असेही त्या म्हणाल्या. कृपया, अर्धवट माहितीवरून जनतेची दिशाभूल करणारे ट्वीट करणे बंद करा, पोलिस ठाण्यात जावून दादा्गिरी करण्यापेक्षा हे कधीही चांगले, असा टोलाही मेघना बोर्डीकर यांनी रोहित पवारांना लगावला आहे. नेमके प्रकरण काय? जिंतूर तालुक्यातील बोरी गावात पार पडलेल्या एका अधिकृत कार्यक्रमात मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिली. या व्हिडिओत मेघना बोर्डीकर ग्रामसेवकाला उद्देशून म्हणतात, “असं कुणाचं सालगडी सारखं काम केलं ना, तर याद राख, हे मेघना बोर्डीकरचे शब्द आहेत. कानाखाली मारीन. पगार कोण देते हा? आताच्या आता बडतर्फ करेल. चमचेगिरी कोणाची करायचे नाही, याद रख. तू काय कारभार करतो हे मला माहित नाही का? मी मुद्दामून सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे. हमाली करायची ना तर सोडून दे नोकरी.” आमदार रोहित पवार यांनी मेघना बोर्डीकरांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत मंत्र्यांना आवरण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली.