महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे बहीण व एनडीसी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी सौ. स्नेहलता ताई भास्करराव पाटील खतगावकर यांचे आज दुपारी 3 वाजता अल्पशः आजाराने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर अंत्यसंस्कार उद्या, 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता नांदेड येथील गोवर्धन घाट स्मशानभूमीत होणार आहेत. एक कौटुंबिक आधारस्तंभ गमावला- अशोक चव्हाण अशोक चव्हाण यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. तसेच एक भावुक पोस्टही त्यांनी केली आहे. अशोक चव्हाण म्हणाले, आमच्या ज्येष्ठ भगिनी सौ. स्नेहलताताई भास्करराव पाटील खतगावकर यांचे आज दुपारी वयाच्या 80 व्या वर्षी नांदेड येथे निधन झाले. आई-वडिलांप्रमाणेच त्यांनीही माझ्या जीवनात बालपणापासून मार्गदर्शकाची भूमिका निभावली. त्यांच्या निधनाने मी माझा एक कौटुंबिक आधारस्तंभ गमावला आहे. त्यांची उणिव कायम जाणवत राहिल. स्नेहलता ताई यांनी आपल्या शांत, संयमी व कुटुंबप्रेमी स्वभावामुळे समाजात विशेष आदर प्राप्त केला होता. त्यांच्या निधनाने चव्हाण व खतगावकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, नांदेड जिल्ह्यासह राज्यभरातून विविध स्तरांतील व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक, राजकीय व कुटुंबीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.