मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या संदर्भात ‘सत्यमेव जयते’ असे म्हणत विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारच्या वतीने ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्दप्रयोग करण्यात आला होता. त्यामुळे देशात काँग्रेस विरुद्ध हिंदू समाजामध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची एकत्र शिवसेना ही भाजपसोबत होती. या शब्दप्रयोगाचा विरोध त्या वेळी युतीच्या माध्यमातून करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणाचा सतरा वर्षानंतर निकाल समोर आला आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या काँग्रेस सोबत महाविकास आघाडीमध्ये आहे. असे असताना या प्रकरणाबाबत शिवसेनेची प्रतिक्रिया अद्याप समोर आली नव्हती. त्यात आता अंबादास दानवे यांनी सत्यमेव जयते म्हणत या प्रकरणावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 17 वर्षांनंतर निकाल जाहीर मालेगाव शहरातील 2008 मधील बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 17 वर्षांनंतर आज (31 जुलै) एनआयएच्या विशेष न्यायालयाकडून निकाल जाहीर होणार आहे. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. खटल्यातील प्रमुख आरोपींमध्ये भाजप नेत्या आणि माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, तसेच आणखी पाच जणांचा समावेश होता. या सर्वांना आज निर्दोष सोडण्यात आले. सत्य कधी पराभूत होत नाही -एकनाथ शिंदे सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणी म्हणाले की, सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात कथित आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, पण सत्य कधीही पराजित होत नसतं, हे पुन्हा एकवार सिध्द झालंय. मालेगावच्या स्फोटांप्रकरणी खोटे आरोप करुन तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता. कारण आपली बाजू न्यायाची आहे, याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आदी सात जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही. हिंदू कधीही देशविरोधी कृत्यं करु शकत नाही, कारण देशभक्ती हे हिंदूधर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं. ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी चलनात आणला. याच्यासारखा धादांत त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे? एक काळंकुट्ट पर्व आज संपलंय. हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला गेलाय. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल, यात शंका नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं! जय हिंद, जय महाराष्ट्र, असे शिंदे यांनी म्हटले आहे.