माणिकराव कोकाटेंच्या स्वागत बॅनरवरून छगन भुजबळ गायब:मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये, भुजबळांना लगावला टोला

नाशिक येथील सिन्नर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात कृषी खात्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. कृषिमंत्री पदावर माणिकराव कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच नाशिक येथे आले असता त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. मात्र हेच बॅनर आता चर्चेचा विषय ठरत असल्याचे दिसत आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या स्वागत बॅनरवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा फोटो गायब असल्याचे समोर आले आहे. माणिकराव कोकाटे यांच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो होते. इतकेच नव्हे तर छगन भुजबळ यांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे सुहास कांदे यांचा फोटो देखील या बॅनरवर होता. या फोटोमधून मात्र छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बॅनरबद्दल बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले, माझे आणि त्यांचे काही मतभेद असतील मात्र वैर नाही. जे बॅनर लावले आहेत ते कार्यकर्त्यांनी लावले आहेत. त्यांनी कोणाचे फोटो टाकायचे आणि कुणाचे नाही टाकायचे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी मला विचारून बॅनर लावलेले नाही. मला विचारले असते तर मी त्यांना सांगितले असते भुजबळांचा फोटो टाका. तसेच जे कार्यकर्त्यांना योग्य वाटते ते कार्यकर्ते करतात, असे माणिकराव कोकाटे म्हणाले. दरम्यान, सरकार स्थापन होऊन 4 दिवस झालेत, दम तर काढला पाहिजे. छगन भुजबळांना जे वाटते ते त्यांनी मागावे. मला वाटते भुजबळांनी देशाचा पंतप्रधान व्हावे. मला काय वाटते असेच थोडी होते. जशी मागणी असेल, नेतृत्वाला विचार करायला संधी मिळेल तसे पुढे होते. आम्ही 5 टर्म थांबलो, 20 वर्ष तुम्ही मंत्रिमंडळात होतात आम्ही काही बोललो का? पक्ष वेगळा झाला तरी मंत्रिपद दिले तेव्हा आमच्यापैकी कुणी येऊन माध्यमांना नाराज आहोत असे सांगितले का? बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदल हा होत असतो असे म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांना खोचक टोला देखील लगावला आहे.

  

Share