मनीषा मुसळे -माने हॉस्पिटलमध्ये काळी जादू करत होती:वळसंगकर यांच्या विश्वासू सहकार्याचा दावा; अमावस्येच्या दिवशी काय व्हायचे?
सोलापूर शहरातील प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा संशय असलेली महिला प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे – माने ही हॉस्पिटलमध्ये काळी जादू करत असल्याचा धक्कादायक आरोप केला जात आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या एका विश्वासू सहकार्यानेच हा दावा केला असल्याचे वृत्त एका वेब पोर्टल च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. अमावस्येच्या दिवशी ही महिला रिक्षात बसून यायची आणि काळ्या बाहुल्या, लिंबू तसेच बिब्बा रुग्णालयात विविध ठिकाणी ठेवत असे, असा दावा यात करण्यात आला आहे. या महिलेबद्दल आपण वारंवार डॉक्टरांकडे तक्रार केली होती. त्यामुळे डॉक्टर देखील त्या महिलेच्या तक्रारींना वैतागले होते. अखेर तीन महिन्यांपूर्वीच डॉक्टरांनी सर्व हॉस्पिटलचा कार्यभार आपल्या हातात घेतला. त्यामुळे ही बाई घाबरून गेली होती. त्यामुळे तीची तक्रार करणाऱ्यांना ही महिला त्रास द्यायला लागली. यातूनच या महिलेनी असे अघोरी प्रकार सुरू केले असल्याचा दावा देखील या व्यक्तीने केला आहे. या महिलेच्या विरोधात बोलणाऱ्याला रुग्णालयातून काढून टाकले जात असे. यातच या व्यक्तीला देखील काढून टाकण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रिक्षात बसून जात आणि परत येताच…. अमावस्येच्या दिवशी मनीषा ही महिला ऑन ड्युटी अचानक रिक्षा मधून कुठेतरी जात होती. येताना मात्र ती लिंबू, काही बाहुली तसेच बिब्बा सोबत घेऊन यायची. तसेच हे सर्व साहित्य सर्व दवाखान्यात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत होती. एक मशीन बसवताना देखील तिने त्याखाली या वस्तू ठेवल्या होत्या, अशी माहिती या व्यक्तीने दिली आहे. मुलगा आणि सुनेचीही चौकशी होणार? डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून कुटुंबाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांचे पुत्र आणि या प्रकरणातील फिर्यादी असलेले डॉ. अश्विन वळसंगकर आणि त्यांची सून डॉ. सोनाली वळसंगकर यांना पोलिस चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या आरोपी मनीषा मुसळे – माने यांच्या वकिलांनी या संदर्भात दावा केला आहे. यामध्ये डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्याचे कारण ठरलेल्या संशयित महिलेच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार महिलेने केवळ एक मेल केला आहे. बाकी कुठेही आर्थिक व्यवहार किंवा डॉक्टरांच्या चरित्रावर संशय घेऊन आरोप केलेले नाहीत. संशयित महिलेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून 17 एप्रिल रोजी तिने डॉक्टरांना केलेल्या ई-मेलची प्रतही पोलिसांच्या वतीने जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस आता कसून तपास करत असून आणखी काय माहिती समोर येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण:मुलगा आणि सुनेचीही चौकशी होणार? संशयित महिलेच्या वकिलाचा धक्कादायक दावा