मनोज जरांगेंविरोधात लढण्यासाठी भुजबळांचा वापर केला:आता अश्रू ढाळले तरी त्यांना कोण विचारणार? संजय राऊत यांचा निशाणा

छगन भुजबळ यांनी मनोज जलांगे पाटील यांच्या विषयी टोकाची भूमिका घेतली होती. त्यांनी तशी भूमिका घ्यायला नको होती, असे आमचे मत होते. मात्र आता त्यांना ही भूमिका घ्यायला लावली होती, असे दिसत असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधात लढण्यासाठी भुजबळ यांचा वापर करण्यात आला, असा आरोप देखील त्यांनी केला. मात्र आता त्यांनी कितीही आदळउपट केली, अश्रू ढाळले तरी त्यांना कोणी विचारणार नाही. आता त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा राहावा या मताचे आम्ही सुरुवातीपासून आहे. भुजबळ यांनी त्यावेळी टोकाची भूमिका घेताना दिसत होते. मात्र त्यांच्या मागे एक अदृश्य शक्ती होती. त्याच शक्तीने त्यांना आता वाऱ्यावर सोडले आहे. जी अदृश्य शक्ती एकनाथ शिंदे यांच्या मागे होती, तीच शक्ती भुजबळ यांच्या मागे त्यावेळी होती. मात्र आता ती शक्ती त्यांच्या मागे नाही. त्यामुळेच त्यांचा बळी गेला, असे आमचे आकलन असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सावंत-शिवतारेंवर टीका एक दोन आमदार नाराज झाले तरी या सरकारला तडा जाईल, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे जे आमदार नाराज आहेत ते एक-दोन दिवस लढतील. नंतर त्यांच्या हातात खुळखुळा दिला जाईल आणि ते सर्व आमदार शांत होतील, अशीच शक्यता असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे नग आहेत, नमुने आहेत, त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करायला हवा, असा सल्ला देखील त्यांनी दिला. काही दिवसांपूर्वी त्यांच्याच विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी काय भूमिका घेतली होती? याचा अभ्यास त्यांनी करायला हवा. किती प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप आपण त्यांच्यावर केले होते? असा प्रश्न देखील राऊत यांनी विचारला आहे. अदृश्य गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावे बीड आणि परभणी सारख्या राज्यातील अनेक भागांमध्ये दंगली उसळल्या आहेत. तेथे तणाव निर्माण झाला आहे. त्याकडे लक्ष देण्याची मागणी देखील राऊत यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्याकडे लक्ष द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. मोदी सरकारवर निशाणा एक देश एक निवडणूक यासारख्या अशा अनेक गोष्टी आणण्याचा सरकारकडून प्रयत्न होणार आहे. एक देश आणि एक निवडणूक यासारख्या गोष्टी संघराज्यातील काम करणाऱ्या देशाला किती घातक आहेत, हे भविष्यात कळेल, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. ज्या गोष्टी संविधानाला मान्य नाहीत, त्या गोष्टी लादण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. मुंबई महानगरपालिका सह राज्यातील 14 महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही घेऊ शकत नाही? याचा अर्थ तुमच्या मनामध्ये पाप असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. देशात केंद्र सरकारला पूर्णपणे लोकशाही मोडून काढायची आहे. निवडणूक आयोग संपवायचा आहे आणि संविधानिक संस्था ताब्यात घेऊन देशात घोषित हुकूमशाही निर्माण करायची असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.

  

Share