मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या:हिंगोलीच्या शेवाळा येथील घटना, आखाडा बाळापूर पोलिस घटनास्थळी दाखल
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे चिठ्ठीत नमुद करीत शेवाळा (ता. कळमनुरी) येथील एका व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी ता. १२ पहाटे घडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्हयातील ३९ वी आत्महत्येची घटना आहे. आखाडा बाळापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील नाक्या जवळच मोहन रामराव सावंत (४९) यांचे घर आहे. घरी आई, वडील, मुलगा असा परिवार आहे. मोहन हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेळोवेळी झालेल्या आंदोलनात सक्रीय सहभागी झाले होते. या शिवाय मराठा आरक्षणाच्या सभांमधून त्यांनी स्वयंसेवक म्हणूनही काम केले आहे. मराठा समाजाने वेळोवेळी मोठे आंदोलन उभारूनही आरक्षण मिळाले नसल्याने ते मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते. दरम्यान, मंगळवारी ता. ११ रात्री त्यांनी कुटुंबियांसह भोजन केले. त्यानंतर सर्वजण झोपले असतांना पहाटेच्या सुमारास घरातील पायऱ्याला लावलेल्या लोखंडी एँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा झोपेतून उठल्यानंतर वडिलांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णूकांत गुट्ठे, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, जमादार राजीव जाधव, रामदास ग्यादलवाड, शिवाजी पवार, चालक जाधव यांच्या पथकानेे घटनास्थळी भेट दिली. मयत मोहन यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यात नमुद केले आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. मयत मोहन यांच्या पश्चात आई, वडिल, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.