मराठी प्रकाशकांचा विशेष सत्कार:अभिजात दर्जा मिळवण्यात प्रकाशकांचे मोलाचे योगदान, रंगनाथ पठारे यांचा गौरवोद्गार

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यात श्रीधर व्यंकटेश केतकर, रा.भि. जोशी आदींसारख्या पूर्वसुरींनी मोठे काम करून ठेवले होते. ते काम प्रकाशकांनी वेळोवेळी प्रकाशित केले. त्या पाऊलखुणा प्रकाशकांनी जतन केल्या. त्यामुळेच सरकार दरबारी आम्हाला आमची बाजू ठामपणे मांडता आली, याअर्थी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यात मराठी प्रकाशकांचे मोठे योगदान आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी भाषा अभिजात दर्जा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल प्रकाशन संस्थांचे योगदान लक्षात घेऊन विदिशा विचार मंच आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील सहा प्रकाशन संस्थांचा प्रातिनिधिक सन्मान ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पत्रकार भवन येथे आयोजित या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर पुण्यभूषण फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, कोहिनूर ग्रुपचे संस्थापक-संचालक कृष्णकुमार गोयल, विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी तसेच प्रकाशन संस्थांचे संचालक आणि संपादक उपस्थित होते. यावेळी पुण्यातील राजहंस प्रकाशनाचे संपादक शिरीष सहस्रबुद्धे, उत्कर्ष प्रकाशनाचे संचालक सु.वा. जोशी, दिलीपराज प्रकाशनाचे संचालक राजीव बर्वे, ज्योत्स्ना प्रकाशनाचे संचालक मिलिंद परांजपे, संस्कृती प्रकाशनाच्या संचालक सुनिताराजे पवार आणि मिहाना पब्लिकेशन्सच्या संचालक अमृता कुलकर्णी यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला. प्रा.रंगनाथ पठारे म्हणाले की, २०१३ साली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासंदर्भात खऱ्या अर्थाने काम सुरू झाले आणि २०२४ मध्ये ते वर्तुळ पूर्ण होऊन केंद्र सरकारने सर्व समित्यांचे अहवाल लक्षात घेऊन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यामध्ये प्रकाशकांसह मराठी भाषिक नागरिक, वाचक, मराठी साहित्य क्षेत्रातील संस्था, लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या परीने आवाज उठवला. ज्या कृतीतून खऱ्या अर्थाने काहीही निष्पत्ती होत नाही, अशा साहित्य संमेलनांवर ७० ते ८० कोटी रूपये खर्च केले जातात. त्या तुलनेत अभिजात भाषा म्हणून मराठी भाषेसाठी मिळणारे १० कोटी रूपये ही फार मोठी रक्कम नाही. मराठीचा वाचक दिवसागणिक म्हातारा होत चालला असून तरूण पिढी इंग्रजीकडे वळत आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी सगळ्या घटकांचा समन्वय साधत एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. मराठी भाषा शुध्द किंवा अशुद्ध असे काहीही नसून मराठीची सर्व रूपे ही एकमेकांना बळ देणारी आहेत. त्यामुळे एकमेकांचा आदर करीत मराठी भाषा जोजवली पाहिजे. भाषा जेवढी प्रदूषित होते, तेवढा तिचा विस्तार होतो. इंग्रजी भाषा हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण असून मराठी भाषेने देखील इतर भाषांमधील शब्द स्वीकारत त्याचा विस्तार केला पाहिजे.

  

Share