मी 22 व्या वर्षापासून सफारी गाडीतून फिरतो:मला चोऱ्या माऱ्या करायची गरज नाही; गोपीचंद पडळकरांचा सुरज चव्हाणांवर पलटवार

पुण्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या धनगरी नाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलवणार नसल्याचे विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. यावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी पडळकर यांच्यावर टीका केली आहे. गोपीचंद पडळकर शेक चिल्ली असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. यावर प्रत्युत्तर देत मी 22 व्या वर्षापासून सफारी गाडीतून फिरतो, तेव्हा तुम्हाला चड्डी पण नीट घालता येत नव्हती, असा पलटवार केला आहे. सुरज चव्हाण यांनी गोपीचंद पडळकर यांना चोरी, दरोडेखोर म्हणत डिवचले होते. त्यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, हे मला दरोडेखोर म्हणतात, मी आजपर्यंत कधी या विषयावर बोललो नाही, पण हे सगे राष्ट्रवादीचेच काम आहे. माझ्यावर मंगळसूत्र चोरीचा आरोप केला त्यावेळी त्यांचा अपक्ष आमदार 2009 साली विधानपरिषदेत दोन अडीच हजार मतांनी पडला. मेलेल्या माणसांबद्दल बोलू नये पण त्यावेळेसचे गृहमंत्री आर.आर आबा पाटील यांचा तो एकदम जवळचा व्यक्ती होता, मानस बंधू होते. ज्या लग्नाच्या लग्नपत्रिकेत माझा उल्लेख प्रमुख पाहुणा म्हणून होता, त्या लग्नात भांडण झाली तेव्हा मी तिथे उपस्थित नव्हतो. तरी देखील माझ्यावर केस टाकण्यात आली, हे राष्ट्रवादीचेच पाप आहे. पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, या बिनडोक लोकांना माहिती नाही मी 22 व्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो, तेव्हा तुम्हाला चड्डी पण नीट घालता येत नव्हती, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी सुरज चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान, सूरज चव्हाण यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर चोरीचे गंभीर आरोप केले होते. गोपीचंद पडळकर म्हणाले, मी धनगराचा पोरगा आहे, मला असल्या चोऱ्या माऱ्या करायची गरज नाही. प्रस्तापित व्यवस्थेच्या विरोधात जेव्हा मी बोलतो तेव्हा पोलिस, तहसीलदार असे प्रशासन वापरण्याशिवाय यांच्याकडे पर्याय नसतो. कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा आमचा विषय आहे, आम्ही ठरवू काय करायचे ते. तुमचे एवढे कार्यक्रम होतात आम्ही बोलतो का? हा समाजाचा विषय आहे, समाजाला वाटले तुम्हाला बोलवावे तर तुम्हाला पण बोलवू. सुरज चव्हाण काय म्हणाले होते? गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करताना सुरज चव्हाण म्हणाले, गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस आहे. जसा शेखचिल्ली फांदी कापताना तुटायचा बाजूने बसून स्वतःच झाडावरून पडला होता, तसा हा शेखचिल्ली महायुतीतल्या नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय. या शेखचिल्लीला माहित आहे की, पवारांना विरोध केला तरच राजकीय जिवंत राहू शकतो. पवारांशिवाय या शेखचिल्लीची मार्केट किंमत झिरो आहे. पुढे बोलताना सुरज चव्हाण म्हणाले, अजित दादा पवार यांनी अनेक भाषणामध्ये अनेकवेळा सांगितले आहे. पक्षामध्ये प्रवेश देताना किंवा एखाद्याच्या कार्यक्रमाला जाताना समाजात त्याची प्रतिमा चांगली असावी, राजकीय पार्श्वभूमी चोरी, दरोडेखोरीची नसावी. स्वतःच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे अजितदादांना कार्यक्रमाला बोलवण्याची हिंमत गोपीचंद पडळकरांनी केली नसावी, अशी टीका सुरज चव्हाण यांनी केली आहे.

  

Share