पुण्यातील खराडी परिसरात शनिवारी रात्री पोलिसांनी एका फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात रेव्ह पार्टी उघडकीस आली. पोलिसांनी पाच पुरुष आणि दोन महिलांना घटनास्थळी ताब्यात घेतले. या प्रकरणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर यासंदर्भात रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत लिहिले, कायद्यावर आणि पोलिस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असते. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. या प्रकरणामुळे राजकारणात चर्चा आणि चर्चांना उधाण आले असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका यूट्यूब चॅनलला मुलाखत देताना रोहिणी खडसे यांनी प्रांजल खेवलकर यांच्यासोबतच्या काही आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, बाबांनी तिन्ही भावांनाही मोकळीक दिली होती, तुम्ही जोडीदार शोधून आणू शकता, पण फायनल आम्ही करु. त्यांनी मलाही लग्नाला परवानगी दिली. मी आणि प्रांजल आम्ही शाळेतील मित्र आहोत. आम्ही दहावीलाही सोबत होतो. जेव्हा मी बाबांना सांगितले की, मला याच्याबरोबर लग्न करायचे आहे, तेव्हा बाबांनी आम्हाला परवानगी पण दिली. सध्या आम्ही दोघे चांगल्या पद्धतीने संसार करत आहोत. नंतर बाबाही म्हणाले, तुझा निर्णय बरोबर होता. पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या, माझा नवरा प्रांजल आणि आमच्या कुटुंबीयांचे फार जुने संबंध आहेत. ते पण मूळचे मुक्ताईनगरचे आहेत. त्यामुळे आमच्या दोघांच्या घरातील लोक एकमेकांना फार चांगल्या रितीने ओळखतात. त्यामुळे प्रांजलशी लग्न करायचे ठरवल्यानंतर नवीन असे काही नव्हते. आमचा बघण्याचा किंवा कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाला नाही, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले. माझ्या सासरी आठ जणांचे कुटुंब आहे. त्यामध्ये माझ्या सासूबाई, दीर-जाऊ आणि एक छोटीशी पुतणी आहे. मी खरेदीसाठी फारवेळा दुकानात जात नाही. त्यामुळे प्रांजलच माझ्यासाठी साड्या घेऊन येतो. त्याला माहिती आहे की, ही काही साड्या घ्यायला दुकानात जाणार नाही. त्यामुळे प्रांजलला कुठे चांगल्या साड्या वाटल्या तर तो माझ्यासाठी घेऊन येतो. त्याला खाण्याचाही शौक आहे. त्यामुळे तो मला बऱ्याचदा जेवणासाठी रेस्टॉरंटला घेऊन जातो. मात्र, मला घरचेच जेवण जास्त आवडते, असेही रोहिणी खडसे यांनी सांगितले.