काही खात्यांवरून तिन्ही पक्षात वाद:एक दोन दिवसात खातेवाटप होईल, मंत्री गुलाबराव पाटलांनी केले स्पष्ट

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तसेच अनेक आमदारांना मंत्रिपद देखील मिळाले. मात्र, सध्या खातेवाटप कधी होणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. खातेवाटप रखडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून विरोधक देखील यावरून टीका करत आहेत. यावर आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, खाते मिळणार आहेत, मात्र शपथ घेतल्यानंतर आता आपले मंत्रिपदाचे काम सुरू झाले आहे. पुढील एक ते दोन दिवसांत खाते वाटप जाहीर होईल. खाते वाटपला विलंब झालेला नाही. पण एक दोन खात्यांबद्दल तिघांमध्ये वाद आहे. तिघे एकत्र बसतील आणि चर्चा करतील. त्यानंतर एक दोन दिवसांत खात्यांचे वाटप होईल, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, कुठलेही खाते मिळाले तरी शेवटी खाते हे खाते असते. कॅबिनेट मंत्री होणे एवढे सोपे नाही. पाच वर्षांचा काळ काढल्यानंतर पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद भेटले आहे. मला वाटते दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपद भेटणे ही जळगाव जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. पालकमंत्री असो किंवा कोणते खाते मी मूठल्याही गोष्टीसाठी डिमांड केलेली नाही. नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. त्या विश्वासाला खरा उतरण्याचा मी प्रयत्न करेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जि घटना घडली ती निश्चितपणे निषेधार्ह आहे. सभागृहात सुरेश धस यांनी यासंदर्भात निवृत्त न्यायाधीश किंवा सध्याचे न्यायाधीशांच्या मार्फत चौकशीची मागणी केली आहे. चौकशीत जे निष्पन्न होईल त्यात कोणालाही सोडले जाणार नाही.

  

Share