खाते वाटपाबाबत कुठलाही तिढा नाही:मंत्री उदय सामंत यांचा दावा; आज खातेवाटप जाहीर होण्याचीही व्यक्त केली अपेक्षा

खाते वाटपाबाबत कुठलाही तिढा नाही. याबाबत दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. सरकार विरोधकांना उत्तर द्यायला सक्षम असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप खातेवाटप जाहीर झालेले नाही. यावरुन सत्ताधारी पक्षावर विरोधक टीका करत आहेत. या टीकेला सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात मंत्रीपदावरुन वाद सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. यात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसात खातेवाटप जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्याचाही आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे खातेवाटप कधी? याची देखील चर्चा सुरु आहे. यावर देखील सामंत यांनी आज जाहीर होण्याची आम्हाला देखील अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल, असे देखील सामंत यांनी म्हटले आहे. अजित पवार भुजबळांच्या बाबतीत योग्य निर्णय घेतील छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबाबत योग्य निर्णय त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार हे घेतील. मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांबद्दल बोलणे योग्य नाही. भुजबळांची नाराजी हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. मात्र महायुती म्हणून याबाबत अजित पवार नक्कीच योग्य निर्णय घेतील, असे देखील उदय सामंत यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री सावंत आणि शिवतारेंशी बोलतील तानाजी सावंत आणि विजय शिवतारे हे आम्हाला देखील ज्येष्ठ आहेत. ते देखील मंत्री होते. त्यांना लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलवून घेतील आणि त्यांची समजूत काढतील. त्यामुळे त्यांच्या मनात इतर कोणताही विचार नसेल, याची आम्हाला खात्री आहे, असे देखील उदय सामंत यांनी म्हटले आहे. केवळ 11 ते 12 मंत्री करताना नेत्याचा देखील कस लागतो. असे देखील सामंत यांनी म्हटले आहे. मी जरी काम केले नाही, तर माझे देखील मंत्रीपद काढून घेतले जाऊ शकते. त्यामुळे आम्ही देखील जनतेला अभिप्रेत असे काम केले पाहिजे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना सोबत घेऊन काम करायला हवे आणि महायुतीला न्याय मिळेल, असे काम करायला हवे, असे देखील उदय सामंत यांनी म्हटले आहे. ठाकरेंविषयी बालणे टाळले उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना आमदारांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मार्गदर्शनावर मी का टीका करायची? असा प्रश्न उदय सामंत यांनी उपस्थित केला. हा एक लोकशाहीचा भाग असल्याचे देखील सामंत यांनी म्हटले आहे. या संदर्भातला प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. मात्र, त्यांनी ठाकरेंविषयी काहीही बोलणे टाळले.

  

Share