मनसेचा मोठा नेता मातोश्रीवर:उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वैभव दळवींचा शिवसेनेत प्रवेश; तो आमचा पदाधिकारी नाही- संदीप देशपांडे

महाराष्ट्रात मोठे राजकीय बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोठ्या नेत्याने मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अंधेरी पूर्व येथील वैभव दळवी यांनी अनेक कार्यकर्त्यांना घेऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मनसेतून आलेल्या वैभव दळवी यांच्या हाती शिवबंधन बांधले. वैभव दळवी हे मनसेचे अंधेरी पूर्वचे पदाधिकारी होते. काही दिवसांपासून त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशावेळी ठाकरे गटाचे अनिल परब तसेच इतर मुख्य नेते उपस्थित होते. तो आमचा पदाधिकारी नाही – संदीप देशपांडे दरम्यान, वैभव दळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांचे पदाधिकारी फसवत आहेत. उद्धव ठाकरे यांना बरे वाटावे म्हणून मनसेचे पदाधिकारी फोडला, असे सांगत आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून क्रॉस चेक करून घ्यावे. हा आमचा पदाधिकारी नाही. २०१४ ला हा आमचा पदाधिकारी होता. त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. 2014 ते 2025 या कालावधीत तो ना मनसेच्या बॅनरवर आहे, ना आमच्या कोणत्या पदाचे पत्र त्याला गेले आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. पुढे बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, हा थोडासा बदनाम व्यक्ती आहे. त्याच्यावर 354 सारख्या केसेस आहेत. तो आमचा पदाधिकारी नाही. तरी उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून चेक करून घ्यावे, असा सल्ला देखील संदीप देशपांडे यांनी दिला आहे. दरम्यान, ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा महाराष्ट्रात सुरू आहेत. नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला शिवसेना ठाकरे गटाचे देखील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी ‘हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र’ अशा आशयाचे फलक देखील आणले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले असून आता दोन्ही नेत्यांचे मनोमिलन कधी होणार, अशी उत्सुकता सर्वांना लागली आहे.

  

Share