मोनिका राजळे यांची शाळेच्या खोलीतून सुटका:राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जमावाने हुल्लडबाजी केल्याचा दावा

अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपच्या आमदार व पाथर्डी उमेदवार मोनिका राजळे यांनी स्वतःला एका शाळेच्या खोलीत बंद करून घेतले होते. पोलिसांनी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. बूथ कॅप्चरिंगची माहिती मिळाल्यानंतर आपण शिरसाठवाडी या ठिकाणी गेलो असता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जमावाने हुल्लडबाजी सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. या हुल्लडबाजीमुळेच स्वतःला खोलीत बंद केले असल्याचे त्यांनी सांगितले आहेत. शिरसाठवाडी येथे झालेल्या या घटनेमुळे संरक्षणासाठी मोनिका राजळे यांनी शाळेच्या एका वर्गात स्वतःला बंद करून घेतले होते. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. शिरसाठवाडी येथे बूथ कॅप्चरिंग होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजप आमदार मोनिका राजळे या तेथे भेट देण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी जमाव त्यांच्यावर चालून आल्याचा दावा मोनिका राजळे यांनी केला. जमाव मोठा असल्याने मोनिका राजळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर देखील या खोलीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जमाव होता. तसेच पोलिस बंदोबस्त देखील कमी असल्याने बाहेर निघण्यास मोनिका राजळे तयार नव्हत्या. अशा परिस्थितीत मोनिका राजळे यांनी फोन करत पोलिसांना संपर्क केला व मदत मागवली. बाहेरील जमाव हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचा असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. काही वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाल्या व सुरक्षितपणे मोनिका राजळे यांना बाहेर काढण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

  

Share