अमरावती जिल्ह्यात विधीमंडळाची अनुसूचित जमाती (एसटी) कल्याण समिती 19 ते 21 ऑगस्टदरम्यान दौरा करणार आहे. या दौऱ्यात समिती प्रशासकीय बाबींसह विविध शासकीय कार्यालयांमधील अनुसूचित जमातीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहे. या दौऱ्यामुळे काही कार्यालय प्रमुख तणावात असून अहवाल तयारीसाठी धावपळ सुरू आहे. समितीचे प्रमुख आमदार दौलत दरोडा आहेत. सदस्यांमध्ये हरिश्चंद्र भोये, डॉ. मिलिंद नरोटे, केवलराम काळे, राजू तोडसाम, राजेश पाडवी, शांताराम मोरे, मंजुळा गावित, हिरामण खोसकर, आदित्य ठाकरे, रामदास मसराम, उमा खापरे, इद्रिस नायकवडी, राजेश राठोड, सुनिल शिंदे आणि निमंत्रित सदस्य विनोद निकोले यांचा समावेश आहे. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता समितीचे सदस्य शासकीय विश्रामगृहात एकत्र येतील. सकाळी ९.३० ते १० दरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत अनुसूचित जातीच्या कल्याण योजनांबाबत चर्चा होईल. त्यानंतर १० ते ११ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जमातीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती, आरक्षण, अनुशेष आणि जात पडताळणी विषयांवर चर्चा होईल. सकाळी ११ ते १२ या वेळेत पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील बाबींवर चर्चा होईल. दुपारी १२ ते १२.३० दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल. दुपारी १२.३० ते १ या वेळेत राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला जाईल. दुपारी १ ते १.३० या वेळेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल. दुपारी २.३० ते ३.३० दरम्यान संत गाडगेबाबा विद्यापीठात अनुसूचित जमाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसंदर्भात बैठक होईल. दुपारी ३.३० ते ५ दरम्यान जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल. सायंकाळी ५ ते ६:३० दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी येथील अधिकाऱ्यांसोबत अनुसूचित जमातीच्या कल्याणकारी योजना आणि इतर बाबींवर चर्चा होईल. त्यानंतर समिती शासकीय विश्रामगृहात मुक्काम करेल.