एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी शरद पवारांचा पुढाकार:आयोगाच्या अध्यक्षांशी थेट फोनवरून संवाद साधत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रात्री अचानक पुण्यात शास्त्री रस्ता येथे मोठ्या संख्येने एकत्र जमत आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन गुंडाळण्यात आले. परंतु शनिवारी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात भेट घेऊन चर्चा करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे साकडे घातले. या चर्चेदरम्यान शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या समोर थेट एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी देखील चर्चा केली. विद्यार्थ्यांना अशाप्रकारे सातत्याने आंदोलन करण्याची वेळ पडू नये त्यांचे प्रश्न गांभीर्याने घेऊन सोडवण्यात यावे असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालात उडालेला गोंधळ, तसेच या प्रक्रियेमध्ये दिसून येणारी सातत्याने अपारदर्शकता या गोष्टींमुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करत सरकारला दखल घेण्यास भाग पाडले आहे. कटऑफपेक्षा अधिक गुण मिळून देखील गुणवत्तायादीत नाव न् आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप बघायला मिळत आहे. परिणामी, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी तसेच पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या जागांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.राज्य सरकारने २२५ जागा का कमी केल्या? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.पीएसआय पदांच्या संख्येमध्ये पूर्वी इतकी ४४१ इतकी वाढ करावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे.