मुंबईत 8,476 किलो चांदी जप्त:​​​​​​​विधानसभा निवडणुकीच्या 4 दिवस अगोदर तपास यंत्रणेची मोठी कारवाई

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना मुंबईत तब्बल 8 हजार 476 किलो चांदी जप्त करण्यात आल्याची घटना घडली आहे. एका टेम्पोमधून जप्त करण्यात आलेली ही चांदी पाहून निवडणूक आयोगाचे तपास अधिकारीही चक्रावून गेलेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, मानखुर्द पोलिसांनी वाशी चेकनाका परिसरात नाकेबंदी लावली आहे. या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलिस तपासणी करत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा एक येथून वेगाने जात होता. पोलिसांना त्याचा संशय आल्यामु्ळे त्यांनी त्याला थांबवले. त्याची तपासणी केली. त्यात त्यांना सदर टेम्पोत सुमारे 8 हजार 476 किलो चांदी असल्याचे आढळले. सराफा बाजारात या चांदीची किंमत 80 कोटींच्या आसपास असल्याचा दावा केला जात आहे. टेम्पो चालक ताब्यात पोलिसांनी ही चांदी जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी टेम्पो चालकाला ही चांदी कुणाची आहे याविषयी चौकशी केली असता त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांनी प्राप्तिकर विभाग व निवडणूक आयोगाच्याही कानावर घातली आहे. प्राप्तिकर विभाग आता या चांदीचा मालक कोण? याचा तपास करत आहे. पोलिसही त्यांना याकामी मदत करत आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारीही या घटनाक्रमावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तूर्त प्राथमिक तपासात या चांदीची वाहतूक बेकायदा होत असल्याचा संशय आहे. विधानसभेसाठी 20 तारखेला निवडणूक दुसरीकडे, पोलिस जप्त करण्यात आलेल्या चांदीच्या वाहतुकीची काही वैध दस्तावेज आहेत का याचा धुंडाळा घेत आहेत. तसेच ही संपत्ती बेकायदा असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या 20 तारखेला निवडणूक होणार आहे. त्यानंतर 23 तारखेला मतमोजणी होऊन राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईल. तूर्त राजकीय पक्षांकडून प्रचाराला मोठी धार आली आहे. सर्वच पक्ष मतदारांना वेगवेगळी आश्वासने देऊन आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच चांदीचे एवढे मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागल्यामुळे तिच्या मालकीविषयी वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत.

  

Share