मुंबई महापालिका अधिकाऱ्याला लाचप्रकरणी अटक:75 लाखांची केली होती मागणी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
मुंबई महानगर पालिकेच्या एका अधिकाऱ्याला 75 लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. पालिकेच्याईस्ट वॉर्डमधील पद निर्देशित अधिकाऱ्याने ही लाच घेतली असून मंदार तारी असे त्यांचे नाव आहे. महापालिकेत लाच घेताना सापडल्याने मात्र सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. अंधेरी येथील एका प्लॉटचे बांधकाम न तोडण्यासाठी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे 2 कोटींची मागणी केली होती. मात्र लाच देण्यास तयार नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर तारी यांनी एका खासगी व्यक्तीला लाचेचा पहिला हप्ता म्हणून 75 लाख स्वीकारण्यास सांगून स्वतः पळ काढला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर या रकमेचा गैरलाभ घेण्यासाठी तारी यांनी प्रयत्न केला आणि खासगी व्यक्तीकडून तारी यांनी 75 लख स्वीकारले आणि यावेळी 2 खासगी व्यक्तींना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तारी फरार होते. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी तारी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची जामीनाची याचिका फेटाळून लावली होती. या सगळ्या प्रयत्नांनंतर तारी हे आज पोलिसांसमोर हजर झाले. पोलिसांनी या लाच प्रकरणी तिघांना अटक केली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.