मुंबईनंतर नाशिकरोड रेल्वे स्थानकावर अपघात:चालत्या रेल्वेत चढत असताना प्रवाशाचा हात निसटला, प्रवासी गंभीर जखमी; रुग्णालयात दाखल
मुंबईतील मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी सुमारे 13 प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही घटना ताजी असतानाच आणखी एक रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. हरिद्वार एक्सप्रेस पकडण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी प्लॅटफॉर्मवर चढताना अचानक हात सटकून खाली कोसळला, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर काही काळ स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी प्रवाशाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. जखमी प्रवाशाची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही. रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. याबद्दल रेल्वेचे अधिकारी सुनील अहिरे यांनी माहिती देताना सांगितले की, गाडी चालत असताना प्रवासी चढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याचा हात सटकला आणि तो अडकला. आम्ही प्रसंग बघितल्यानंतर रेल्वेची चेन ओढत प्रवाशाला बाहेर काढले. हरिद्वार एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही. ठाण्यात ट्रेनमधून 13 प्रवासी पडले, 6 जणांचा मृत्यू:जखमी आणि मृतांच्या आकडेवारी बाबतही प्रशासन अनभिज्ञ; प्रवाशांकडून संताप व्यक्त ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी काही प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी काही जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हे प्रवासी ट्रेनच्या दरवाज्याला लटकलेले होते, जिथून ते खाली पडले. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना लोकल ट्रेनची आहे. सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दीमुळे हा अपघात झाला. मात्र, या घटनेत किती प्रवासी जखमी आहेत आणि किती जणांचा मृत्यू झाला? या बाबत प्रशासन अद्याप माहिती देऊ शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत 13 प्रवासी पडले, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. वाचा सविस्तर