हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आज अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि नाशिक या ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरला असून, काही ठिकाणी पाणी साचून वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. दरम्यान, पुढील चार दिवसांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र दक्षिण गुजरात व मराठवाड्यासह विदर्भाचा बहुतांश भाग पावसाने व्यापणार आहे. किनारपट्टी प्रदेशात बहुतांश भागात अधून मधून वादळी वाऱ्याची शक्यता आहे. मुंबई: सबवे बंद, सखल भाग जलमय मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाने जोर पकडला. अंधेरीमध्ये पावसामुळे सबवेमध्ये पाणी साचल्याने ती वाहतुकीसाठी तात्पुरती बंद करण्यात आली. शहरात आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी अनेक सखल भागांमध्ये अजूनही पाणी साचले आहे, ज्यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पालघर: वसई-विरारमध्ये पावसाचा कहर पालघर जिल्ह्यातील वसई आणि विरार परिसराला जोरदार पावसाने झोडपले आहे. सायंकाळच्या वेळी कार्यालयातून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना पाण्यातून वाट काढावी लागली. रस्त्यांवरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली. हवामान खात्याने रात्रीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पालघरमध्ये 7 जुलैला शाळांना सुटी जाहीर हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला उद्यासाठी रेड अलर्टचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर, 7 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये हा आदेश जारी केला आहे. कल्याण-डोंबिवली: पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी कल्याण आणि डोंबिवलीत सकाळपासूनच अधूनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत. काही वेळा पाऊस हलका तर काही वेळेस अचानक जोरदार सरी कोसळत आहेत. हवामान विभागानं दिलेल्या अलर्टनुसार, रात्री उशिरा पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भिवंडी: बाजारपेठा जलमय, व्यावसायिकांचे नुकसान भिवंडीत दुपारपासून पडणाऱ्या पावसामुळे तीनबत्ती बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नाशिक: गोदावरीला पूरस्थितीचा इशारा नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले असून, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्यास सांगितले आहे. गंगापूर धरणातून सध्या ५,१८६ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, त्यात वाढ करण्यात आली आहे. यामुळे रामकुंडातील पाणीही वाढले असून, पुढील काही तास निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.