भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या:सांगली जिल्ह्यातील खळबळजनक घटना, कुऱ्हाडीचे घाव घालून केले ठार

भाजप स्टार्टअप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सांगलीत घडली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, सुधाकर खाडे यांचा शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास पंढरपूर रोडवरील राम मंदिरालगत असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून एका व्यक्तीशी वाद झाला होता. या वादातून त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आला. त्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांना मिरज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे हत्याकांडा घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. सुधाकर खाडेंची का झाली हत्या? सुधाकर खाडे यांनी मिरज – पंढरपूर रस्त्यावरील राम मंदिरालगत चंदनवाले मळा येथील पावणे 4 एकर जमीन सचिन जगदाळे नामक व्यक्तीकडून विकसनासाठी घेतली होती. पण त्यावर लक्ष्मण चंदनवाले यांनी हरकत घेतली होती. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. गत काही महिन्यांपासून या प्रकरणी त्यांचा खाडे यांच्यासोबत वाद सुरू होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही खाडे शनिवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसोबत वादग्रस्त भूखंडाला कुंपण घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा शेत जमिनीचे कब्जेधारक असणाऱ्या चंदनवाले कुटुंबीयांशी वाद झाला. यावेळी सुधाकर खाडे व चंदनवाले कुटुंब यांच्यात जोरदार वाद झाला. त्यात कार्तिक चंदनवाले याने अचानक खाडे यांच्या मानेवर मागच्या बाजूने कुऱ्हाडीने हल्ला केला. हा घाव वर्मी बसल्यामुळे खाडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चंदनवाले कुटुंबाने सुधाकर खाडे यांच्या सहकाऱ्यांवरही हल्ला चढवला. यामुळे घटनास्थळी मोठी धावपळ झाली. या धावपळीतच सुधाकर खाडे यांना मिरज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी कार्तिक चंदनवाले नामक आरोपीस अटक केली आहे. हा आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिसात कार्तिक चंदनवाले लक्ष्मण चंदनवाले, शंकर चंदनवाले, काशिनाथ चंदनवाले यांच्यासह 3 महिलांविरोधात गांधी चौक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोण होते सुधाकर खाडे? सुधाकर खाडे यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेले. तिथे ते मनसेचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते भाजपच्या स्टार्टअप इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. त्यांनी 2014 मध्ये तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूकही लढली होती.

  

Share