ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेलो नाही:छगन भुजबळ यांनी दावा फेटाळला; म्हणाले – पुस्तक वाचून कारवाईचा विचार करणार
ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेलो नाही, तर विकासासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो. राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेले पुस्तक मी स्वत: वाचणार आहे. माझ्या वकीलांनादेखील देणार असून निवडणुकीनंतर यावर काय कारवाई करता येईल ते बघून कारवाई करणार आहे, असा इशाराही भुजबळांनी दिला. मी कुठलीही मुलाखत लोकसत्ताला दिली नाही. महाराष्ट्र सदन प्रकरणी उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना क्लीनचीट मिळाली, तेव्हा मी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पेढे देखील दिले. आम्ही काही जेलमध्ये जाण्याच्या भीतीने सरकारमध्ये गेलो नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. निवडणुकीच्या काळातच पुस्तक का आले? सरदेसाई यांच्या पुस्तकांमधील दाव्याबद्दल भुजबळांकडून खरे खोटे करण्यात आले असून आपण अशी कोणतीही मुलाखत दिलेली नसून या प्रकरणी निवडणुकीनंतर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विकासासाठी सरकारसोबत गेलो आहे. मी कुठलीही मुलाखत दिलेली नाही. आक्षेपार्ह दाव्यावर कारवाई केली जाईल. निवडणुकीच्या काळातच पुस्तक का आले? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा एकच अर्थ म्हणजे ईडीपासून सुटका, असे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे. तर ओबीसी असल्यामुळेच माझ्यावर ईडीची कारवाई झाली, असे अनेक प्रकारचे खुलासे भुजबळ यांनी केले आहेत असे वृत्त आहे. सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या शक्यतेने अजित पवारांना घाम फुटला होता, असा दावाही या पुस्तकात केला आहे. नेमके काय दावे? पुस्तकामध्ये म्हटलंय की, भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांना झाला. कारण अर्थातच ईडीपासून सुटका. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात राहूनही ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत कितीवेळा चौकशांना सामोरे जायचं. तुरुंगात असताना भाजपात आलात तरच सुटका होईल, असं अनिल देशमुखही म्हणतात, अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते, आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.