पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ रविवार १० ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने झाला. सकाळी ११ वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. याच कार्यक्रमात बेंगळुरू-बेळगावी आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस सेवांचाही प्रारंभ करण्यात आला. ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून ६ दिवस (मंगळवार वगळता) सकाळी ६.२५ वाजता पुणे स्थानकावरून सुटेल. त्याच दिवशी संध्याकाळी ६.२५ वाजता अजनी येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक २६१०२ अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून ६ दिवस (सोमवार वगळता) सकाळी ९.५० वाजता अजनी स्थानकावरून सुटेल. त्याच दिवशी रात्री ९.५९ वाजता पुण्यास पोहोचेल. या गाडीचे थांबे वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्या नगर आणि दौंड हे आहेत. प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीनुसार ही ट्रेन स्लीपर वंदे भारत असावी अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या ही सेवा एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कार स्वरूपात सुरू करण्यात येत आहे. एसी चेअर कारचे भाडे सुमारे १५०० रूपये आणि एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे ३५०० रूपये असणार आहे. नियमित सेवा गुरूवार १४ आॅगस्टपासून सुरू राहणार आहे. देशात नागपूर-पुणे मार्ग सर्वात लांब पल्ल्याचा आहे. केवळ १२ तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे. या गाडीची संरचना ८ कोचेसची आहे. यामध्ये १ एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि ७ चेअर कार समाविष्ट आहेत. या गाडीत एकूण ५३० प्रवाशांची आसनव्यवस्था आहे. एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये ५२ आसने आहेत. ५ चेअर कार कोचमध्ये प्रत्येकी ७८ आसने आहेत. लोको पायलटच्या कोचला जोडलेल्या २ चेअर कार कोचमध्ये प्रत्येकी ४४ आसने आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांकरीता ही आनंदाची गोष्ट असल्याचे सांगितले. त्यांनी स्वतः रेल्वेमंत्र्यांना यासाठी विनंती केली होती. नागपूर-पुणे मार्गावर खूप ट्रॅफिक असून, अनेकवेळा खासगी बसचे भाडे ५ हजार रुपयांपर्यंत जाते. लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची विनंती केली होती. त्याला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.