नागपूरच्या उमरेड येथील ॲल्युमिनियम कंपनीत भीषण स्फोट:7-8 कामगार गंभीर जखमी, अग्निशमन विभागाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी परिसरातील अल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणाऱ्या कंपनीत शुक्रवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 7-8 जण गंभीर जखमी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. कंपनीत काही कामगार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात असून अग्निशमन विभागाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कंपनीचे नाव एमएमपी असे असून शुक्रवारी रात्री सात साडेसातच्या सुमारास स्फोटानंतर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना नागपुरातील मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले असल्याचे समजते. या कंपनीमध्ये अल्युमिनियम पावडर असल्याने आग विझवताना अडचणी येत आहेत. पावडर जळून खाक झाल्यानंतरच ही आग विझेल, अशी माहिती उमरेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही.