नाना पटोले आरएसएसचे एजंट:युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळकेंचा थेट आरोप

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक एजंट आहेत. त्यांनी भाजपच्या अनेक उमेदवारांशी साटेलोटे केले. त्यामुळेच आपला पराभव झाल्याचा थेट आरोप संघाचे मुख्यालय असलेल्या मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांनी केला. त्यामुळे काँग्रेसच्या समीक्षा बैठकीतच खळबळ उडाली होती. मध्य नागपूर मुस्लिम आणि हलबा समाज बहुल आहे. हलबा समाजाला उमेदवारी नाकारल्याने मोठ्या प्रमाणात समाज भाजपवर नाराज होता. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येण्याची कुठलीही शक्यता नव्हती. राजकीय समीकरणे व धार्मिक समीकरणे काँग्रेसच्या बाजूने होती. यानंतरही आपला अकरा हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. गुरुवारी सर्व पराभूत उमेदवारांची बैठक मुंबई येथील टिळक भवन येथे बोलावण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सुनील केदार, प्रफुल गुडधे, गिरीश पांडव यांच्यासह अनेक उमेदवार उपस्थित होते. यावेळी बंटी शेळके यांनी थेट नाना पटोले यांच्यावरच तोफ डागली. मध्य नागपूरमध्ये काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी रोड शो केला. मात्र या रोड शोला नाना पटोले उपस्थित नव्हते. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या असतानाही पटोले यांनी येथे येण्याची तसदी घेतली नाही. मध्य नागपूरमध्ये प्रचाराला काँग्रेसचा एकही पदाधिकारी जाणार नाही याचीच अधिक काळजी त्यांनी घेतली. मागील निवडणुकीत आपण अवघ्या चार हजार मतांच्या फरकांनी पराभूत झालो होतो. यानंतरही प्रदेशाध्यक्षांनी उमेदवारीसाठी आपले नाव पॅनेलमध्ये टाकले. इच्छुक उमेदवारांमधून त्यांचे नाव काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत जाऊ दिले नाही. शेवटी राहुल गांधी यांनी यात हस्तक्षेप केला आणि आपल्याला तिकिट दिले. हे नाना पटोले यांना पटले नाही. त्यांनी आपले काही खास नेते आणि कार्यकर्त्यांमार्फत भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांना मदत केल्याचाही आरोप शेळके यांनी केला आहे. बंटी शेळके एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी काँग्रेसच्या भर बैठकीत पटोले यांच्यावर तिकीटा विकल्याचाही आरोप केला. आपल्याला राहुल गांधी यांनी उमेदवारी दिली होती. मी शेळके कुटुंबाचा नव्हे तर काँग्रेसचा अधिकृत उमेदवार होतो. पंजा चिन्हावर लढलो. असे असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आणि भाजप उमेदवाराच्या विरोधात एकट्याच्या बळावर निवडणूक लढावी लागली. प्रचाराला संघटना नव्हती. नेत्यांना प्रचारासाठी प्रदेशाध्यक्षांनी पाठवले नाही. प्रदेशाध्यक्ष या नात्याने पटोले एकदाही मध्य नागपूरमध्ये प्रचारासाठी आले नाहीत. कुठलीही मदत केली नाही, अशा शब्दात बंटी शेळके यांनी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत पटोले यांच्यावर शरसंघान साधले.

  

Share