‘नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!’:मनसे नेते संदीप देशपांडेंचा टी-शर्ट चर्चेत, दादर कबूतरखाना वाद चिघळणार? ‘नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!’:मनसे नेते संदीप देशपांडेंचा टी-शर्ट चर्चेत, दादर कबूतरखाना वाद चिघळणार?

‘नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!’:मनसे नेते संदीप देशपांडेंचा टी-शर्ट चर्चेत, दादर कबूतरखाना वाद चिघळणार?

दादरमधील कबुतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरून सध्या मुंबईत जोरदार वाद पेटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील 51 कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना दाणे घालण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले असतानाही काही जैन समुदायातील व्यक्ती वेगवेगळ्या मार्गाने कबुतरांना दाणे टाकत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अशा व्यक्तींवर कारवाई केली असली, तरी त्यांच्या हट्टी आणि माजोरड्या वृत्तीवर संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी परिधान केलेला टी-शर्ट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा टी-शर्ट घालून ते दादर परिसरात फिरताना दिसले. त्यांनी घातलेल्या या टी-शर्टवर “नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!” असा मजकूर लिहिलेला होता. हा संदेश म्हणजे मुंबईत राहूनही कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या अमराठी भाषिकांना अप्रत्यक्ष इशारा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मनसे आता दादर कबुतरखाना प्रकरणी अधिक आक्रमक होणार का? हे पहावे लागणार आहे. पोलिस कारवाईनंतर कबुतरखाना ट्रस्टची भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने दादर कबुतरखाना बंद ठेवण्याचे आदेश कायम ठेवल्यानंतरही काही नागरिक कबुतरांना दाणे घालण्यापासून परावृत्त झालेले नाहीत. लालबाग येथील महेंद्र संकलेचा या व्यक्तीने आपली कार कबुतरखान्याजवळ आणून गाडीच्या छतावर ट्रे ठेवून कबुतरांना खायला दिले. स्थानिकांनी त्याला हटकले असता, “आम्ही अशा अजून 12 गाड्या आणणार आहोत. न्यायालयाने दाणे टाकायला मनाई केली आहे, पण मी गाडीवरून खायला घालतो,” अशी उघडपणे माजोरडी भाषा केली होती. याप्रकरणी पोलिसांनी महेंद्र संकलेचाची गाडी जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर दादर कबुतरखाना ट्रस्टने आपली जबाबदारी टाळत परिसरात फलक लावून कबुतरांना दाणे न घालण्याचे आवाहन केले आहे. कोणीही कबुतरांना दाणे घालू नयेत आणि जर कारवाई झाली तर ट्रस्ट जबाबदार राहणार नाही, असेही ट्रस्टने म्हटले आहे. ट्रस्टने महापालिकेकडे सकाळी 6 ते 8 या वेळेत धान्य घालण्याची परवानगी मागितली आहे. पालिकेने मौखिक परवानगी दिल्याचे सांगितले जात असले तरी, ती अद्याप लेखी स्वरूपात मिळालेली नाही. त्यामुळे ट्रस्टने हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान ठेवत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. गिरगाव कबुतरखान्यातही वाढलेली संख्या दादरप्रमाणेच गिरगाव चौपाटी परिसरातील कबुतरखान्यातही पक्ष्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. न्यायालयाने नुकतेच स्पष्ट केले होते की, कबुतरखान्यांबाबत निर्णय घेताना नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे. त्यामुळे आता मुंबई महापालिका गिरगाव चौपाटी येथील कबुतरखान्यावर काय पावले उचलणार, याकडे पक्षीप्रेमींसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *