नाशिकमध्ये डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू:मोठ्या आवाजामुळे आले नाका-तोंडातून रक्त, तरुणाला इतरही आजार असल्याची शक्यता

सन उत्सव म्हटले की डीजेच्या दणदणाटात नाचणे हे सर्वत्रच मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. मात्र डीजेचा आवाज जिवावर देखिल बेतू शकते. नाशिक येथे अशीच एक घटना घडली असून डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नितीन फकिरा रणशिंगे, वय २३ असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या संदर्भात आणखी माहिती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी नाशिकच्या फुले नगर परिसरात डीजे लावण्यात आला होता. नितीन हा तरुण परिसरात आला असता डीजेच्या आवाजाने त्याच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. नितीन रणशिंगे या तरुणाचा मृत्यू हा डीजेच्या आवाजाने झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचसोबत या तरुणाला इतरही काही आजार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. दोन वर्षांपूर्वीही घडली होती अशीच घटना सांगली येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या अवजाने दोघांचा मृत्यू झाला होता. विसर्जन मिरवणुकीत डीजे, बँजो, ढोल यांचा तीव्र आवाज सहन न झाल्याने शेखर सुखदेव पावशे (वय 32) या तरुणाला नाजत असतानाच हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. यात त्याचा मृत्यू झाला. तर दुसरी घटना वाळवा तालुक्यातील दुधारी येथे घडली. येथे डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ झाल्याने प्रवीण यशवंत शिरतोडे (वय 35) याला मिरवणुकीतच चक्कर आली. मित्रांनी तातडीने त्याला दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या दोन्ही घटनांमुळे न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसिबलपेक्षा अधिक आवाजाने स्पीकर वाजवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर, डीजे, ढोलचा आवाज ३५ डेसिबलच्या आत ठेवूनच गणरायाला निरोप द्यावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

  

Share