नवाब मलिक यांच्या अडचणी पुन्हा वाढणार:त्यांचा वैद्यकीय जामीन रद्द करण्याची मागणी, ईडीच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल

नवाब मलिक यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढणार असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवाब मलिक यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. त्यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन देण्यात आला होता. मात्र आता त्यांची प्रकृती चांगली असून त्यांचा वैद्यकीय जामीन रद्द करावा, अशी मागणी ईडीने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजपचा विरोध असताना देखील अजित पवारांनी नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नवाब मलिक यांचे दाऊदसोबत संबंध असल्याचे आरोप भाजपने केले होते. तसेच त्यांना अटक देखील करण्यात आली होती. असे असून देखील महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवाब मलिक यांनी प्रवेश केला. एवढेच नव्हे तर अजित पवारांनी नवाब मलिक यांना उमेदवारी देखील जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये या विषयावरुन मतभेद असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सध्या मलिक हे जामिनावर बाहेर आहेत. त्यात आता त्यांचा जामिनच रद्द करण्याची मागणी ईडीच्या वतीने करण्यात आली आहे. भाजपच्या नाऱ्यालाही केला विरोध ‘बटेंगे ते कटेंगे’ ही घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात दिली आहे. त्यांच्या या नाऱ्याला देखील नवाब मलिक यांनी विरोध केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मानखुर्द शिवाजी नगर येथील उमेदवार नवाब मलिक यांनी देखील अजित पवारांप्रमाणे बाजू मांडली. नवाब मलिक म्हणाले की, “बटेंगे तो कटेंगे’ सारखी विधाने चुकीची, घृणास्पद आहेत. यातून कोणताही फायदा होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेशचे खूप नुकसान झाले आहे. अगदी मंदिराच्या उभारणी नंतरही उत्तर प्रदेशात भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गराजांवर राजकारण केले पाहिजे. लोकांच्या विकासाची चर्चा व्हायला हवी. हिंदू-मुस्लिमच्या नावावर कोणीही देशाचे विभाजन करू नये, असे स्पष्ट मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले होते. वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. नवाब मलिक यांना 2022 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. नवाब मलिकवर अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांसोबत पैशांच्या व्यवहाराचा आरोप होता. ईडीचे पथक डॉन दाऊद इब्राहिमसोबत पैशाचे व्यवहार आणि त्याच्या बहिणीसोबतच्या जमिनीच्या व्यवहाराचा तपास करत होते. नवाब मलिक हे अनेक दिवस तुरुंगात होते आणि काही महिन्यांपूर्वीच त्यांना वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर करण्यात आला होता. नवाब मलिक यांच्यावर नेमका काय आहे आरोप? नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दाऊदच्या टोळीशी संबंधित व्यक्तीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर करण्यात आला आहे.या प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांच्या घरावर धाड मारली होती. त्यानंतर 23 फेब्रुवारीला नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. नवाब मालिकांना सुरुवातीला 7 मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती, यानंतर त्यांना 4 एप्रिल आणि 18 एप्रिल पर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती नवाब मलिक यांना ईडीने 2022 मध्ये गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. नंतर ऑगस्ट 2023 मध्ये ते अटीशर्तीसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. प्रकृतीचे कारण देत जामीन मिळावा अशी मागणी तेव्हा त्यांनी केली होती. क्रूझ ड्रग्ज प्रकरणादरम्यान मलिक चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आरोपी होता. मात्र एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे मलिक तेव्हा चर्चेचा विषय ठरले होते.

  

Share