निमोणला दिवसा घरफोडी करणारा चोरटा 8 दिवसांत गजाआड:पाच लाख 96 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
निमोण गावातील निवृत्ती पांडुरंग उगले यांच्या राहत्या घरातून दि. ३ डिसेंबर रोजी दिवसा घरफोडी करीत ६ लाखांचा मुद्देमालावर दरोडा घालणार्या चोरट्यास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी शिताफीने सूत्रे हालवत आठ दिवसात अटक केली असून पाच लाख ९६ हजारांचा मुद्देमाल देखील परत मिळविला आहे. मालेगावचे अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांनी गुरुवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता चांदवड पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याचा उलगडा केला. अधीक्षक भारती यांनी सदर गुन्हानंतर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची नेमणूक करीत फिर्यादीचे जवाब, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण याप्रकारे झालेल्या तपासातून व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे संशयीत हा निमोण गावातीलच असून संजय उगले (४०, रा. निमोण) याला तपासाकामी ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्याने चोरलेल्या ६ लाख १ हजार रुपयांच्या मुद्देमालापैकी सोन्या-चांदीचे दागिने व ११ हजारांची रोकड असा एकूण ५ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल काढून दिला. त्यात केवळ ५ हजाराचा मोबाइल फोन मिळून आला नाही. हा गुन्हा पोलीस हवालदार भाऊसाहेब गुळे, पोलीस हवालदार अमोल जाधव, सुनील जाधव, पोलीस विक्रम बस्ते आदींच्या पथकाने उघडकीस आणला.