राज्यात मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरू असतानाच, झारखंड मधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी संसद भवनाच्या लॉबीमध्ये दुबे यांना प्रश्न विचारला होता. मात्र, वाद इथेच थांबला नाही आणि लोकसभेत पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. लोकसभेत ऑपरेशन सिंदूर वरील चर्चा सुरू असताना निशिकांत दुबे भाषण देत होते. यादरम्यान वर्षा गायकवाड सतत बोलत राहिल्या, ज्यामुळे दुबे नाराज झाले. दुबे यांनी विचारले, “जर हे असेच चालू राहिले तर संसद कशी चालेल?” ते पुढे म्हणाले, “पाहा, या बहिणीला हेही माहित नाही की संसदेच्या लॉबीमध्ये जे काही घडते ते मजा आणि मस्तीने घडते, पण त्या ते सांगतात, जर आम्ही त्यांच्या भाषणाच्या मध्ये असे बोलू लागलो तर काँग्रेसचा एकही खासदार संसदेत शब्दही बोलू शकणार नाही. गायकवाड यांची तीव्र प्रतिक्रिया दुबेंच्या विधानांमुळे वर्षा गायकवाड आक्रमक झाल्या आणि त्यांनी पुन्हा एकदा दुबेंवर प्रश्नांचा वर्षाव केला. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी लोकांचा अपमान केला आहे, म्हणून आम्ही त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे.” पीठासीन अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप गदारोळ वाढू लागताच पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी वर्षा गायकवाड यांना गप्प राहण्याचे निर्देश दिले आणि स्पष्ट शब्दात सांगितले की, “तुम्ही तुमच्या जागेवरून बसून कोणतीही टिप्पणी करू नका, मी तुम्हाला मध्ये बोलण्याची परवानगी दिलेली नाही, कृपया कामकाजात व्यत्यय आणू नका, असा इशारा पीठासीन अधिकाऱ्यांनी वर्षा गायकवाड यांना दिला. नेमके प्रकरण काय? महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना संसद भवन परिसरात अचानक गाठून घेराव घातला होता. यावेळी या महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांच्यासमोर जय महाराष्ट्राच्या घोषणा देखील दिल्या होत्या. महिला खासदारांच्या या घोषणांमुळे संसद भवन परिसर दणाणून गेला होता. महिला खासदारांचा हा रुद्रावतार पाहून खासदार निशिकांत दुबे यांना तिथून पळ काढावा लागला होता, असा दावा वर्षा गायकवाड यांनी केला होता. या घडलेल्या घटनेचा संसद भवन परिसरामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.