नितेश राणेंना सल्ला देणारे ट्विट डिलीट:मला जो मेसेज द्यायचा होता तो दिला, नीलेश राणेंचे पोस्ट हटवल्यावर स्पष्टीकरण
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात वाद उफाळून आला आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर समितीच्या कामांवर तात्पुरती स्थगिती घालण्यात आली. याच पार्श्वभूमीवर धाराशिव येथे आयोजित भाजपच्या मेळाव्यात मंत्री नितेश राणे यांनी जोरदार भाष्य करत म्हटले की, “कोणी कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचले, तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील. मुख्यमंत्रिपदावर बसलेला नेता भाजपचाच आहे, हे लक्षात ठेवा.” या वक्तव्यानंतर नितेश राणे यांचे बंधू व शिवसेनेचे कुडाळचे आमदार नीलेश राणे यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट करून त्यांना सल्ला दिला. नितेश राणे यांनीही त्या पोस्टला प्रत्युत्तर दिले. काही वेळातच नीलेश राणे यांनी ती पोस्ट हटवली. त्यानंतर आता त्यांनी स्वतःच ती पोस्ट मागे घेण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. काय म्हणाले नीलेश राणे? पोस्ट डिलीट केल्यावर नीलेश राणे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, नितेश राणे यांच्याबाबत केलेले ते ट्विट मी अधिकार वाणीने केलेले होते. नितेश हा माझा लहान भाऊ आहे आणि त्याने मला वडिलांप्रमाणेच माण दिलेला आहे. त्याला हक्काने बोलणे हा नितेशने मला दिलेला अधिकार आहे आणि त्या सहजतेने मी त्याला बोललो. मी ट्विट डिलीट केले, मला जो त्यातून मेसेज द्यायचा होता तो मी दिला. मी यापूर्वी सुद्धा अनेक ट्विट डिलीट केले आहेत. त्यामुळे ट्विट डिलीट केले त्यातून वेगळा अर्थ काढू नका. उबाठाला यातून फायदा घेण्यासारखे काही नाही. एका भावाने दुसऱ्या भावाला दिलेला तो सल्ला होता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.