मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नाही:पक्षाने घेतलेला निर्णय मान्य, दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण, भुजबळांबाबत केले मोठे भाष्य

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात काही जुन्या तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे ज्येष्ठ नेत्यांना डच्चू मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. मात्र, दिलीप वळसे पाटील यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे आपण नाराज आहात का? असा प्रश्न दिलीप वळसे पाटील यांना विचारला असता, पक्षावर माझी काहीही नाराजी नसल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. तसेच पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे, असेही ते म्हणाले. छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत विचारले असता, छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत. ते नाराज होऊ शकतात. तसेच अनेक जण नाराज देखील असतील. मात्र मी नाराज नाही, असे ते म्हणाले. छगन भुजबळ बंडाच्या तयारीत? मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली. तसेच जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असे सूचक विधानही त्यांनी केले. सोबतच आपण कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे छगन भुजबळ आता बंड पुकारण्याच्या तयारीत तर नाहीत ना? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. नाराजी दूर केली जाईत छगन भुजबळ यांची नाराजी दूर केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महायुतीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. छगन भुजबळ यांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती चांगले स्थान देईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भुजबळांना डावलल्यानंतर विरोधकांकडून महायुतीवर टीका
छगन भुजबळ ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा वापर करण्यात आला आणि नंतर मात्र त्यांना बाजूला करण्यात आले, असल्याची टीका काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. छगन भुजबळ हे ओबीसी आक्रमक चेहरा आहेत. त्यामुळे ते मंत्रिमंडळात हवे होते, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

  

Share