शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूर हे एक यशस्वी मोहीम होती. यात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. राजनाथ सिंह हे एक आदरणीय संरक्षण मंत्री आहेत. ते देशाला काय घडले याची माहिती देऊ शकले असते. प्रत्येक प्रश्न विरोधी पक्षाकडून येत नसतो. काही प्रश्नांची उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशातील जनतेच्या मनातील प्रश्न विरोधी पक्षाने उपस्थित केले आहेत. याचे मी स्वागत करते. सत्ताधारी पक्ष त्यांचे उत्तर देईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज चर्चा होईल, मला आशा आहे की पंतप्रधान दोन्ही सभागृहांना उपस्थित राहतील, असेही त्या म्हणाल्या. या संदर्भात प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, मला आशा आहे की, पंतप्रधान केवळ लोकसभेतच नव्हे तर संसदेच्या दोन्ही सभागृहात बोलतील. ऑपरेशन सिंदूर नंतर, आम्ही विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. पण ते होऊ दिले गेले नाही. आम्ही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली होती, पण ती झाली नाही. आम्हाला या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ऑपरेशन सिंदूर वर चर्चा हवी होती, पण ती झाली नाही. पंतप्रधानांनी आता आपली रणनीती, पाकिस्तान आणि इतर सर्व गोष्टींबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. मला आशा आहे की पंतप्रधान मोदी भारतीय हितापेक्षा क्रिकेटला प्राधान्य देणाऱ्यांना स्पष्ट उत्तर देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पाकिस्तानचा सहभागाचा पुराव्याची आवश्यकता नाही पहलगाम दहशतवादी हल्ल्यात “स्वदेशी दहशतवादी” सहभागी असू शकतात आणि मारेकरी पाकिस्तानातून आले आहेत याचा “कोणताही पुरावा” अद्याप देण्यात आलेला नाही, या काँग्रेस खासदार पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर शिवसेना ठाकरे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सोमवारी प्रतिक्रिया दिली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याबद्दल लोकांना “कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नाही” असे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. लोकांना पुराव्यांची गरज नाही. आम्ही त्याचा सामना केला आहे. हे सर्व पाकिस्तानने केले आहे, जो स्वतः प्रगती करू शकत नाही आणि इतर कोणीही तसे करावे असे त्यांना वाटत नसल्याचे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.