संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला आणि त्यानंतर राबवण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर यावरील चर्चेत बोलताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘ऑपेरशन सिंदूर’ हे सरकारने माध्यमांमध्ये केलेला एक तमाशा होता’ असे वादग्रस्त विधान केले होते. यावरून त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली होती. यावर स्पष्टीकरण देताना प्रणिती शिंदे यांनी भाजपवरच पलटवार केला आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या, देशभक्ती आणि राष्ट्रवाद आम्हाला ना भाजप शिकवू शकते ना ट्रोल्स शिकवू शकतात. मी एवढेच विचारू इच्छिते की जे वारंवार सैनिकांचा अपमान करतात आणि म्हणतात की एका व्यापाऱ्याला जास्त अडचणी सहन कराव्या लागतात, सैनिकांपेक्षा जास्त. हा अपमान नाही का? असा सवाल प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, आमच्या भाषणामुळे त्या सव्वीस मृतांच्या कुटुंबीयांना वाईट वाटले असेल, तर हजार वेळा माफी मागू, पण भाजपचे ट्रोल्स, ट्रोलिंग आर्मी आणि अंधभक्तांची मी कधीच माफी मागणार नाही. तसेच ऑपरेशन सिंदूर जे करण्यात आले, त्याचे सर्वस्वी श्रेय हे सैनिकांचे होते पण याचे क्रेडिट भाजप घेत आहे आणि त्याचा एक पीआर स्टंट तयार करण्यात आला असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. काय म्हणाल्या होत्या प्रणिती शिंदे? लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान प्रणिती शिंदे म्हणाल्या, ऑपरेशन सिंदूर हे माध्यमांमध्ये सरकारचा ‘तमाशा’ होता. या ऑपरेशनमध्ये काय साध्य झाले हे कोणीही सांगत नाही. किती दहशतवादी पकडले गेले? आपण किती लढाऊ विमाने गमावली? याला कोण जबाबदार आहे आणि कोणाची चूक आहे? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.