महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी OYO हॉटेल्सबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी OYO हॉटेल्सबाबत गंभीर आरोप केले आहेत. अनेक ठिकाणी ओयोशी संलग्न असलेल्या हॉटेल्समध्ये केवळ एका तासासाठी खोली भाड्याने का मिळते? याचा पोलिस विभागाने अभ्यास करावा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी OYO ही हॉटेल चेन देशभरातील तसेच महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांवर आपली सेवा पुरवते. अनेक पर्यटक या हॉटेल्स आणि लॉजिंग सुविधांचा वापर करतात. मोठमोठ्या शहरांमध्येही अनेक हॉटेल्स OYO सोबत जोडलेली आहेत. मात्र, आता भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या OYO हॉटेल्सचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला आहे. नेमके काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार? “एक OYO नावाची हॉटेल चेन तयार झाली आहे. मी येताना बघितले की शहराच्या 20-20 किलोमीटर बाहेर एका निर्जन ठिकाणी OYO हॉटेल दिसते. मनात शंका आली की हे OYO हॉटेल चेन काय आहे. या अतिशय गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. या OYO हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही”, असे मुनगंटीवार विधानसभेत आपल्या भाषणादरम्यान म्हणाले. एका तासासाठी खोली भाड्याने का मिळते? “या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिली जाते. ती कशासाठी दिली जाते? हा पोलिस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे. OYO च्या हॉटेलमध्ये 20-20 किलोमीटर जाऊन कुणीही प्रवासी राहात नाही. कारण हा प्रवासी जर तिथपर्यंत जात असेल, तर त्याचे अर्थशास्त्र कच्चे आहे. कारण जाण्या-येण्याच्या टॅक्सीला जितका खर्च येतो, त्यापेक्षा शहरातल्या एका हॉटेलमध्ये राहणे जास्त परवडते. पण ते लोक OYO मध्ये जातात”, असे गणित यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले. OYO मध्ये संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर… “खरंतर महाराष्ट्रात संस्कृतीरक्षकांचे सरकार आहे. इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल, तर गृहराज्यमंत्र्यांनी OYO चा अभ्यास करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात किती OYO हॉटेल आहेत, याची माहिती त्यांनी देण्याची गरज आहे”, असेही त्यांनी नमूद केले. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेलचा मुद्दा उपस्थित केला आहे. हे ही वाचा… भास्कर जाधव यांचा अजित पवारांवर हल्लाबोल:निधी वाटपावरून विधानसभेत टीका, म्हणाले- कोणाला किती पैसे द्यायचे, हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात? राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी निधीचा मुद्दा उपस्थित करत अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कोणाला किती पैसे द्यायचे हे अर्थमंत्री कसा ठरवू शकतो? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. पूर्ण बातमी वाचा… नरहरी झिरवळांना मंत्री असल्याचा विसर?:स्वतः मंत्री असूनही प्रश्न विचारणाऱ्या आमदाराला म्हणाले मंत्री महोदय; विधानसभेत खसखस राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी अन् विरोधकांत जोरदार खडाजंगी पहावयास मिळत आहे. पण त्याचवेळी काही हलके – फुलके प्रसंगही घडत आहेत. सोमवारी असाच एक मजेशीर प्रसंग विधानसभेत घडला. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना आज काहीसा आपल्या मंत्रिपदाचाच विसर पडला. ते चक्क प्रश्न विचारणाऱ्या आमदारालाच दोनवेळा मंत्री महोदय म्हणाले. त्यांचे हे शब्द ऐकताच सभागृहात एकच खसखस पिकली. पूर्ण बातमी वाचा…