पहलगाम हल्ल्यातील मृतांना ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरवावे:कुटुंबातील एका सदस्याला शासकीच नोकरी द्यावी, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथील भ्याड अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांच्या कुटुंबीयांनी हिंमतीने संपूर्ण प्रसंगाचा सामना केला. म्हणूनच त्यांना येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘नागरी शौर्य’ पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे. यासोबतच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मला खात्री आहे की ते या विनंतीचा नक्कीच विचार करून यावर सकारात्मक निर्णय जाहीर करतील, असा आशावादही सुळे यांनी यावेळी व्यक्त केला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दुपारी दशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश होता. यामध्ये डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी, पुण्यातील कौस्तुभ गणबोटे, संतोष जगदाळे आणि पनवेल येथील दिलीप डिसले या पर्यटकांचा निष्पाप बळी गेला. आता या कुटुंबीयांना महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘नागरी शौर्य’ पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनीह सरकारकडे केली आहे. सुप्रिया सुळे पत्रात नेमके काय म्हणाल्या? जम्मू काश्मीर या राज्यातील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरीकांची हत्या करुन दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. अतिरेक्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने (सर्व राहणार डोंबिवली), दिलीप डिसले (पनवेल), कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे पुण्याचे रहिवाशी मरण पावले. या घटनेमुळे देशातील जनमानस शोकसंतप्त आहे. ही घटना भारतीयत्वावर हल्ला असून या दहशवादी कारवाईचा निषेध करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी नागरीक एकजूट झाले आहेत. आम्ही सर्वजण एक देश म्हणून भारत सरकारच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. या घटनेचा वृत्तांत ऐकूनच अंगाचा थरकाप उडतो मग प्रत्यक्ष अनुभवलेल्या नागरीकांची काय स्थिती असेल याची कल्पनाही करवली जात नाही. आपल्या घरातील कर्ते पुरुष अतिरेकी अगदी टिपून-टिपून मारत असताना इतर कुटुंबियांनी या कठीण प्रसंगाचा धीरोदात्तपणे सामना केला. या संपूर्ण घटनेत त्यांनी दाखविलेली हिंमत अतिशय मोलाची आहे. आपली जीवाभावाची माणसं डोळ्यांदेखत मारली जात असताना अशी हिंमत दाखविणे सोपे नाही. म्हणूनच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांच्या कुटुंबीयांना या 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरविण्यात यावे. तसेच या घटनेत या कुटुंबांनी जे गमावले याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही पण तरीही या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे. स्व संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी या उच्चशिक्षित असून त्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेता येणे शक्य आहे. याच धर्तीवर इतर पीडितांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेता येईल. या कृतीद्वारे या शूर कुटुंबियांना महाराष्ट्रातील जनता सदैव आपल्यासोबत उभी आहे असा विश्वास शासनाने द्यावा, ही नम्र विनंती. मला खात्री आहे की महाराष्ट्र शासन या विनंतीचा नक्कीच विचार करुन त्यावर सकारात्मक निर्णय जाहीर करेल, असे सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.