पाकिस्तानमध्ये घुसून मारा, मात्र दहशतवाद्यांचा विषय संपवा:रोहित पवारांचा सरकारला पाठिंबा; म्हणाले- ‘मदत करणारेही मुस्लिमच होते’

दहशतवादाला धर्म नसतो, मात्र काही लोक याला जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सरकारला पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारायचे असेल तर त्यांनी मारावे. सर्वांचा सरकारला पाठिंबा असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारला कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात रोहित पवार म्हणाले की, पाकिस्तानमध्ये तुम्हाला घुसायचे असेल तर घुसून मारा. मात्र या सर्व दहशतवाद्यांचा विषय कायमस्वरूपी संपवायला हवा. मात्र काही लोक धार्मिक विषय घेऊन पुढे घेऊन जात आहेत. मदत करणारे देखील मुस्लिम होते, हे विसरता येणार आहे. यामध्ये धार्मिक विषय न धरता, दहशतवादाला जात आणि धर्म नसतो, हे लक्षात ठेवावे. सरकारने दहशतवाद्यांच्या विरोधात कोणताही निर्णय घेतला तरी सर्व पक्ष आणि सर्व लोक या सरकार-सोबत राहतील, असे देखील आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. पुलवामा नंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, 27 जणांचा मृत्यू पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये युएईचा एक पर्यटक आणि नेपाळचा एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. उर्वरित पर्यटक उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील आहेत. महाराष्ट्रातील सहा पर्यटक या हल्ल्यात ठार झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्स नुसार, दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातून आलेल्या शुभम द्विवेदीचे नाव विचारले आणि नंतर त्याच्या डोक्यात गोळी झाडली. शुभमचे लग्न फक्त दोन महिन्यांपूर्वी झाले. तो त्याच्या मधुचंद्रासाठी इथे आला होता. लष्कर-ए-तैयबाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

  

Share