बिहारमधील पूर्णियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. भूतबाधा झाल्यानंतर तीन दिवसांनी एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांनी एकाच कुटुंबातील ५ जणांना चेटकीण असल्याच्या संशयावरून मारहाण केली आणि नंतर पेट्रोल शिंपडून त्यांना जिवंत जाळले. त्यानंतर सर्व मृतदेह घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावात फेकून देण्यात आले. ही घटना मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील तेटगामा येथे घडली. मृतांमध्ये बाबू लाल उरांव (५०), त्यांची पत्नी सीता देवी (४८), आई कातो देवी (६५), मुलगा मनजीत कुमार (२५) आणि सून राणी देवी (२३) यांचा समावेश आहे. मुलाच्या मृत्यूनंतर रविवारी रात्री गावात पंचायत झाल्याचे सांगितले जाते. त्यात हा तालिबानी निर्णय देण्यात आला. पंचायतीत गावातील २५० ते ३०० लोक उपस्थित होते. या घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी बाबू लाल उरांवचा मुलगा सोनू कुमार याने पळून जाऊन कसा तरी त्याचा जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच, जिल्हाधिकारी अंशुल कुमार आणि पोलिस आधीक्षक स्वीटी सेहरावत तीन पोलिस ठाण्यांच्या पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सर्व मृतदेह तलावातून बाहेर काढले. सदर एसडीपीओ पंकज कुमार म्हणाले, बाबूलाल उरांव यांचे कुटुंब जादूटोणा करत असे. गावातील रामदेव उरांव यांच्या मुलाचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तो काही दिवसांपासून आजारी होता. कुटुंबातील सदस्य त्याला बाबूलाल उरांव यांच्या घरी घेऊन गेले. तिथे भूतविद्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात एसपींनी एसआयटी स्थापन केली आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी एफएसएल आणि श्वान पथकाला बोलावण्यात आले. ३ जणांना अटक करण्यात आली आहे.


By
mahahunt
8 July 2025