पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ:बुडणारे सहा भाविक थोडक्यात बचावले, वाळवंटातील मंदिरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ:बुडणारे सहा भाविक थोडक्यात बचावले, वाळवंटातील मंदिरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात

पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ:बुडणारे सहा भाविक थोडक्यात बचावले, वाळवंटातील मंदिरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात

आषाढी वारीसाठी वारकऱ्यांनी पंढरपूरची वाट धरली आहे. लाखो भाविक व वारकरी पालखी सोहळ्यासह पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात येत असतानाच येथील चंद्रभागा नदीला पूर आला आहे. पाण्याचा अंदाज येत नसल्याने भाविकांच्या बुडण्याच्या घटना समोर येत आहेत. रविवारी 22 जून रोजी सहा भाविक चंद्रभागेत बुडत होते, परंतु वेळीच लक्ष दिल्याने त्यांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी या सहा जणांचे प्राण वाचवले आहेत. स्नान करण्यासाठी भाविक चांदरभेच्या पाण्यात उतरले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात ते वाहत जात होते. यावेळी तिथे कोळी बांधव कर्तव्यवर असताना त्यांचे लक्ष गेले व त्यांनी तातडीने बचावकार्य करत या भाविकांचे प्राण वाचवले आहेत. सध्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीला पूरस्थिती येऊ नये यासाठी उजनी धरणातून सुमारे 26,600 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यात्रा काळात पाऊस झाल्यास धरणात साठवणूक होण्यासाठी प्रशासनाने हे नियोजन केले असून पुढील पाच ते सहा दिवस हे विसर्ग सुरू राहणार आहे. बुडणाऱ्या भाविकांचे प्राण वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 40 स्थानिक कोळी बांधवांची नियुक्ती केली आहे. याच कोळी बांधवांनी काल सहा भाविकांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, चंद्रभागेच्या तीरावर योग्य त्या सुरक्षारक्षकांची नेमणूक झाल्यास अशा बुडण्याच्या घटना टाळता येतील, अशी भाविकांचे म्हणणे आहे. आषाढीच्या काळात भाविकांना महापुराचा त्रास होऊ नये, यासाठी उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी चंद्रभागा नदीत पोहोचू लागले आहे. त्यामुळे चंद्रभागा आणि वाळवंटातील काही मंदिरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. आषाढीला भाविकांना स्नानासाठी आवश्यक तेवढेच पाणी ठेवण्याच्या उद्देशाने 28 ते 29 जूनपर्यंत पाणी विसर्ग सुरू राहणार आहे. त्यानंतर पाऊस झाल्यास उजनी धरणात वरून येणारे पाणी साठवता येईल, अशी खबरदारी घेतली जात असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. पुंडलिक मंदिराकडे जाण्यासाठी पाण्यातूनच मार्ग दरम्यान, सध्या चंद्रभागा वाळवंटातही पाणी वाढू लागले असून, पुंडलिक मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. आषाढी वारीदरम्यान भाविक चंद्रभागेच्या पाण्यात स्नान करत असल्याने प्रशासनाने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. यात्रा काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यासही उजनी धरणात पाणी साठवता यावे, यासाठी आतापासूनच धरणातून नियोजित पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काल भागवत एकादशी निमित्त पंढरपूर महासफाई अभियानांतर्गत पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि आमदारांसोबत सुमारे 600 स्वयंसेवकांनी सफाई मोहीम राबवली.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *