पंढरपुरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलेला 21 लाखांची लॉटरी:पांडुरंगच पावला म्हणत केल्या भावना व्यक्त, चांगले घर व मुलांच्या शिक्षणाचा घेतला निर्णय

पंढरपुरात एका स्वच्छता कर्मचारी महिलेला पांडुरंगच पावला आहे. या महिलेला 21 लाखांची लॉटरी लागली आहे. पांडुरंगच पावला, अशी भावना मनीषा वाघेला या महिलेने व्यक्त केली आहे. मनीषा वाघेला यांचे पंढरपूर येथील मेहतर गल्लीत 10X10 चे पत्र्याचे छोटे घर आहे. स्वच्छतेचे काम करून कुटुंबाचे उदरनिर्वाह चालते. अशा या गरीब महिलेला 21 लाखांची लॉटरी लागली असल्याने या महिलेचा व कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मनीषा वाघेला या मेहतर समाजाचे असून मेहतर समाज पंढरपूरमध्ये गेल्या अनेक दशकांपासून वास्तव्यास आहे. या समाजाकडे स्वच्छतेचे काम दिले जाते. मनीषा वाघेला या पंढरपूर येथील चौफाळा येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी तिथेच एक लॉटरीचे दुकान होते. मनीषा यांनी सहज एक लॉटरीचे तिकीट काढावे म्हणून एक तिकीट खरेदी केले होते. नंतर त्या हे तिकीट देखहील विसरून गेल्या होत्या. काही दिवसांनी त्यांनी सहज वृत्तपत्रात लॉटरीच्या तिकिटाचा नंबर चेक केला आणि त्यांना आनंदाचा धक्काच बसला. काहीच ध्यानीमनी नसताना मनीषा यांना तब्बल 21 लाख रुपयांचे बक्षीस लागल्याचे त्यांना कळले. 21 लाख रुपये जिंकल्यावर या पैशांचे काय करणार, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, चांगले घर घेणार आणि आपल्या मुलांना हे काम करावे लागू नये म्हणून त्यांना चांगले शिक्षण देणार. मेहतर समाज हा स्वच्छतेचे काम करतो. पंढरपूर येथे गेल्या अनेक पिढ्यांपासून मेहतर समाज वास्तव्यास आहे. अत्यंत गरिबीत हा समाज आपल्या कुटुंबाचे पालन करतो. स्वच्छतेच्या कामातून मिळकत देखील कमीच असते, त्यामुळे घरात आठरा विश्व दारिद्र्य. अशा परिस्थितीत एखादे मोठे बक्षीस लागले तर नक्कीच आनंद होणार व दारिद्रयातून बाहेर पडण्याची व चांगले आयुष्य सुरू करण्याची संधी मिळते. तसेच आता मेहतर समाजातील मनीषा वाघेला यांना 21 लाखांचे बक्षीस मिळाले असून त्यांनी देखील चांगले घर घेण्याचा तसेच आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

  

Share