‘बटेंगे तो कटेंगेच्या’ घोषणेवरून भाजपच्याच नेत्याचा युटर्न:असा कोणताही विषय महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही – पंकजा मुंडे

विधानसभा निवडणुकीचा प्रचार महाराष्ट्रात जोरदार सुरू आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिले आहे. अनेक ठिकाणी प्रचारात त्यांनी बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा दिल्या, तसेच इतर भाजपच्या नेत्यांनी देखील या घोषणा दिल्या आहेत. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध दर्शवला असून टीका देखील करण्यात येत आहे. अशात आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील या घोषणेवरून यूटर्न घेतला असल्याचे दिसत आहे. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना पंकजा मुंडे यांनी त्यांचे परखड मत मांडले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, खरे सांगायचे झाले तर माझे राजकारण वेगळे आहे. मी भाजपची आहे म्हणून मी या घोषणेचे समर्थन करणार नाही. विकसांच्या मुद्द्यावर राजकारण झाले पाहिजे. सर्व नागरिकांना सोबत घेऊन नेत्याने काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे असा कोणताही विषय महाराष्ट्रात आणण्याची गरज मला वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, मी ऑन एयर कुठे बोलले आहे का? ते फक्त प्रिंटला आले आहे. यावर मी लवकरच बोलेल. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील या घोषणेचा विरोध केला होता, तसेच त्यांच्याच पक्षातील नेते व उमेदवार नवाब मलिक यांनी देखील भाजपच्या घोषणेचा विरोध केला होता. भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार म्हणाले, आम्ही शाहू, फुले आंबेडकर यांचे विचार मानतो. त्यामुळे अशा घोषणांना काहीही अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नवाब मलिक यांनी देखील अशा घृणास्पद घोषणा महाराष्ट्रात नाही चालणार तसेच या घोषणांचा काही उपयोग देखील होत नाही, झाला असता तर मग अयोध्येत भाजप का हरली, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता.

  

Share